मुंबई (mumbai) महानगर प्रदेशातील महानगरपालिका (bmc) क्षेत्रातील नाट्यगृहांच्या (drama theatres) भाड्यात दरवर्षी 5 टक्के वाढ केली जाते.
मात्र आता ती कमी करून केवळ 1 ते 2 टक्के करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री ॲॅड. आशिष शेलार (ashish shelar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
तसेच भाडेवाढीचा आधी कोविडपूर्वीचे मूळ दरच ठेवण्यात येणार आहे. संबंधित महानगरपालिकांनी याबाबत फेरविचार करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्रालयात झालेल्या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, अभिनेते प्रशांत दामले, निर्माते प्रसाद मच्छिंद्र कांबळी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे प्रतिनिधी, बृहन्मुंबई महापालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांच्यासह विविध महानगरपालिकांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत महानगरपालिकांनी वीज, देखभाल आणि दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे भाडेवाढ आवश्यक असल्याचे सांगितले.
मात्र, मराठी नाट्यसृष्टीचे हित आणि महानगरपालिकांची आर्थिक शाश्वतता यांचा समतोल राखत दरवर्षी 5 टक्क्यांऐवजी केवळ 1 ते 2 टक्के वाढ करण्याबाबत फेरविचार करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.
दरम्यान, दादर, परळ, लालबाग आणि शिवडी परिसरात नाट्यसाहित्य, नेपथ्य आणि बस पार्किंगसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नाट्य व्यावसायिकांनी केली.
पावसाळ्यात नेपथ्याचे नुकसान होत असल्याने आणि व्यावसायिक दराने गोडाऊन घेणे परवडत नसल्याने शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावर मानखुर्द येथील अतिक्रमणमुक्त जागेवर फिल्म सिटीसाठी प्रस्तावित जागांपैकी काही जागा नाट्यसृष्टीसाठी गोडाऊन आणि वाहनतळासाठी उपलब्ध करून देता येतील का, याबाबत महिनाभरात व्यवहार्य पर्याय सादर करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनाही पर्यायी जागेचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.
नाट्यगृहांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प, एलईडी जाहिरात फलक आणि अन्य उत्पन्नवाढीच्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी महानगरपालिकांनी पुढील तीन महिन्यांत विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देशही मंत्री शेलार यांनी दिले.
हेही वाचा
