खडसेंना राष्ट्रवादीत घेण्यामागे पवारांचं राजकीय गणित पक्कं- संजय राऊत

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. खडसेंच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यामागे काय कारण आहे? अशीही चर्चा सुरू आहे. मात्र खडसेंना प्रवेश देण्यामागे शरद पवारांची राजकीय गणितं असू शकतात, असा अंदाज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी वर्तवला आहे.

खडसेंच्या राजीनाम्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, एकनाथ खडसे यांनी ज्या पक्षासाठी तब्बल ४० वर्षे काम केलं, तोच पक्ष त्यांना आयुष्याच्या या टप्प्यावर डोळ्यात अश्रू घेऊन सोडावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल. कदाचित त्यांची राष्ट्रवादी सोबत कुंडली जुळली असेल, असं संजय राऊत म्हणाले. (shiv sena mp sanjay raut reacts on eknath khadse joining ncp and sharad pawar political strategy )

हेही वाचा - एकनाथ खडसेंसोबत मुलगीही राष्ट्रवादीत? तर सून भाजपमध्येच

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे शिवसेनेत जातील, असंही म्हटलं जात होतं. परंतु त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचं ठरवलं. त्यावर, मला शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांच्या ऑफर होत्या. मात्र, मी राष्ट्रवादीची निवड केली. कारण, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत. पण सक्षम नेता नाही. तिथं पक्षाचा विस्तार करण्यास वाव आहे. त्यामुळंच मी राष्ट्रवादीत जाण्याचं ठरवलं, असं एकनाथ खडसे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं. 

त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी मांडलेली भूमिका मी ऐकली. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसला पटल्यानेच त्यांनी एकनाथ खडसेंना प्रवेश दिला असेल. शिवाय सध्याच्या राजकारणातील सर्वात ताकदवान नेते असलेले शरद पवार आपल्या पक्षात उगाच कोणाला प्रवेश देणार नाहीत. त्यांना त्यांचं महत्त्व पटलं असेल. पक्षाबाहेर गेलेल्यांना पुन्हा प्रवेश न देण्याची भूमिका घेणारे शरद पवार यांची भाजपमधील एका प्रमुख नेत्याला प्रवेश देताना काही राजकीय गणितं असू शकतात, असा अंदाजही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - राजीनाम्यानंतर खडसेंचा पुन्हा फडणवीसांवर प्रहार…
पुढील बातमी
इतर बातम्या