मुंबई दक्षिण-मध्यमधून एकनाथ गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची सहावी यादी मंगळवारी रात्री जाहीर केली. या यादीत ९ जणांच्या नावांचा समावेश असून महाराष्ट्रातील ७ नावे या यादीत आहेत. यादीनुसार दक्षिण-मध्य मुंबईमधून एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसंच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील उमेदवार

काँग्रेसनं नंदूरबारमधून के. सी. पडवी, धुळ्यातून कुणाल रोहिदास पाटील, वर्ध्यातून माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या कन्या अ‍ॅड. चारुलता टोकस, यवतमाळ वाशिममधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, दक्षिण-मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, शिर्डीतून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भंडारी समाजाचे नेते नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील आतापर्यंत १२ उमेदवार जाहीर झाले असून त्यात मुंबईतील ३ जागांचा समावेश आहे.

१४६ उमेदवार जाहीर

काँग्रेसनं ११ एप्रिलपासून होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत १४६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तसंच, काँग्रेसच्या पहिल्या यादीत १५ उमेदवारांची नावे होती. दुसऱ्या यादीमध्ये २१ तर तिसऱ्या यादीमध्ये १८ उमेदवारांची नावे होती. चौथ्या यादीत २७ आणि पाचव्या यादीत ५६ जणांना उमेदवारी देण्यात आली होती.  


हेही वाचा -

'मनसेने लोकसभा निवडणूक लढवावी आणि डिपॉझीट वाचवून दाखवावे', विनोद तावडेंचे राज ठाकरेंना आव्हान

निवडणूक न लढवताच करा भाजपाविरोधात प्रचार, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश


पुढील बातमी
इतर बातम्या