'नवलाई' शेलारांच्या नऊ कोटींच्या फ्लॅटची

भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार वादात अडकण्याची शक्यता आहे. आशिष शेलार यांची पत्नी, प्रतिमा शेलार यांच्या नावे वरळीतील ओंकार टॉवर या इमारतीत फ्लॅटची नोंदणी करण्यात आली आहे. 31 व्या मजल्यावरच्या 3101 क्रमांकाच्या या प्लॅटचे बाजारमूल्य 9 कोटी रुपये इतके आहे. दुय्यम निबंधकांच्या दफ्तरी 7 जून, 2017 रोजी या फ्लॅटच्या दस्तावेजांची नोंदणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी फेसबुकवर पोस्टमार्फत या मुद्द्याच्या ठिणगीतून वादाचा निखारा पेटवण्याचा प्रयत्न केला आहे.

शेलार यांची मालमत्ता

2014 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विजयी झालेल्या आशिष शेलारयांनी निवडणुकीआधी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नियमानुसार स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या स्थावर आणि जंगम संपत्तीची माहिती दिली आहे. या शपथपत्रानुसार, आशिष शेलार आणि त्यांच्या पत्नीच्या नावे मिळून 1 कोटी 46 लाख रुपयांची जंगम मालमत्ता (मुव्हेबल असेटस्) आणि 3 कोटी 56 लाख 54 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यात ते वास्तव्य करत असलेल्या 603/ सहावा मजला, सी विंग, हायलँड कोर्ट, वांद्रे (पश्चिम) या घरासह पवई येथील एक फ्लॅट तसेच रत्नागिरी आणि मालवण येथील शेतजमिनीचा समावेश आहे.

तीन वर्षांच्या आमदारकीत आशिष शेलार यांनी 9 कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट विकत घेण्याइतकी संपत्ती कशी कमावली? असा सवाल तिरोडकर यांनी केला आहे.

आशिष शेलार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या फ्लॅटचा करारनामा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ashish shelar.docx

यासंदर्भात 'मुंबई लाइव्ह'ने आशिष शेलार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. 

मुळात यात वाद निर्माण होण्यासारखं काय आहे? हेच कळत नाही. वरळी येथील 9 कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट विकत घेण्याची तयारी मी सुरू केली होती, हे खरं आहे. कायदेशीर मार्गाने प्लॅट विकत घेण्यात गैर काय आहे? मी अद्याप फ्लॅट विकत घेतलेला नाही. 50 लाख रुपये बुकींगमूल्य आणि 45 लाख रुपयांचे मुद्रांकशुल्क मी भरलं आहे. या फ्लॅटखरेदीसाठी कर्ज मंजूर होण्याची मी प्रतिक्षा करत होतो. हा अतिशय स्वच्छ आणि सरळ व्यवहार आहे. सद्यस्थितीत बाजारातली परिस्थिती लक्षात घेता फ्लॅटखरेदीचा हा व्यवहार मी रद्द करण्याचा विचार करतोय.  ओंकार टॉवरमधील फ्लॅट विकत घेण्यासाठी योग्य ग्राहक मिळाल्यास मी तो विकणार आहे. या प्रकरणात कोणतीही आर्थिक झळ बसू नये, हा सर्वसामान्यांसारखा विचार मी ही करतो.

आशिष शेलार

मुंबई भाजपा अध्यक्ष

बोलविता धनी कोण?

केतन तिरोडकर यांनी याआधीही काही राजकारण्यांवर आरोप केले होते. याखेपेस आशिष शेलार यांना लक्ष्य करणाऱ्या तिरोडकर यांचा अंतःस्थ हेतू काय? त्यांचा कुणी बोलविता धनी आहे का? हा प्रश्नही राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चिला जात आहे. 

संधी हुकली?

थोडक्यात, आशिष शेलार यांच्या दाव्याप्रमाणे ते हा फ्लॅट स्वतःकडे राखण्याच्या मनःस्थितीत नाहीत. ‘मुंबई लाइव्ह’ला मिळालेल्या माहितीनुसार, याच इमारतीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगयांनीसुद्धा फ्लॅट घेतले आहेत. वाद आणि चर्चेपलीकडे जाऊन पहायला गेले तर या इमारतीत न राहण्याचा निर्णय आशिष शेलार यांनी अंमलात आणल्यास त्यांची क्रिकेटपटूंचा शेजार लाभण्याची संधी हुकणार आहे.

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या