'ट्युबलाइट''मुळे 'दंगल'

  Mumbai
  'ट्युबलाइट''मुळे 'दंगल'
  मुंबई  -  

  सोशल मीडियाच्या मदतीने राजकारण आणि वकिलीची सरमिसळ कशी करावी, हे आपल्याकडे शिकावं असं बहुतेक भारतीय पार्टीचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार सुचवू पाहत आहेत. आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटाला प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केलं आहे. शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “ट्युबलाइट कालबाह्य झाली आहे. आता जमाना एलइडीचा आहे. एलइडी ही 'दंगल' प्रमाणे आहे. जगभरात चांगला प्रतिसाद मिळतो.’’

  सर्वसामान्य चित्रपटरसिकाच्या नजरेतून पाहिल्यास आशिष शेलार यांनी केलेलं ट्विट सकृतदर्शनी अगदी साधंसरळ वाटतं. चित्रपटांचे ‘शौकीन आणि कदरदान’ असलेल्या आशिष शेलार यांच्याकडून अशा पद्धतीची प्रतिक्रिया येते, यात आश्चर्य वाटण्यासारखं विशेष काही नाही. पण इथेच तर ‘कहानी में ट्विस्ट’ आहे.


  "Tubelight" is fused. Best is to go for LED. It is like "Dangal". Appreciated all over the world.@mayankw14

  — ashish shelar (@ShelarAshish) June 27, 2017


  एक तीर आणि...


  चित्रपट समिक्षक मयांक शेखर यांनी केलेल्या ट्विटला उत्तरादाखल आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तसं करताना सलमान खान डिवचला जाईल, याचीही काळजी त्यांनी घेतली आहे. आशिष शेलार यांचे राजकीय प्रतिस्पर्धी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि सलमान खानची मैत्री जगजाहीर आहे. दरवर्षी सलमान न विसरता बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीला आवर्जून उपस्थित राहतो. हे वर्षसुद्धा अपवाद नव्हतं.

  राजकीय वैऱ्याचा मित्र हा आपला मित्र असूच शकत नाही, याची खूणगाठ बहुतेक शेलार यांनी बांधून ठेवली आहे. वांद्र्यात सलमान खान राहतो त्या 'गॅलेक्सी' इमारतीच्या समोर होऊ घातलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या कामात ‘खो’ घालणाऱ्यांमध्ये सलमान खान आणि त्याचे वडील पटकथा-संवादलेखक सलीम खान यांचाही समावेश होता. या मुद्द्यावर मुंबई महानगरपालिका विरुद्ध खान अशा वादात आशिष शेलार यांनी उडी घेतली होती. ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा ‘सदिच्छादूत’ असलेल्या सलमानच्या घरासमोर शौचालय उभं न होऊ देण्याच्या भूमिकेवर भाजपाच्या वतीने चार खडे बोलही सुनावण्यात आले होते. या प्रकरणात सलमानने त्याच्या स्वभावाला न साजेसा संयम दाखवला होता.

  आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विटमध्ये एलइडीचा संदर्भ आहे. मरीन ड्राइव्ह परिसरातल्या एलइडीच्या मुद्द्यावरून युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातला कलगी तुरा चांगलाच रंगला होता. ‘ट्युबलाइट’च्या आडून आदित्य ठाकरे यांना चिमटा काढण्याची संधीही आशिष शेलार यांनी साधली आहे.


  ‘ट्युबलाइट’वरून ‘दंगल’


  ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ अशी ओळख मिरवणाऱ्या आमिर खान राज्य सरकारच्या पर्यायाने भाजपाच्या ‘गुडबुक’मध्ये आहे. आशिष शेलार यांनी तिकीटखिडकीवर कमाईचा नवा उच्चांक नोंदवणाऱ्या ‘दंगल’चं कौतुक केलं आहे. म्हणजे पुन्हा सलमानच्या जखमेवरची खपली काढणं आलंच. ‘ट्युबलाइट’पेक्षा ‘दंगल’ चांगला याचा ध्वन्यार्थ सलमानपेक्षा आमिर चांगला असाही असू शकतो.

  एकूण, आशिष शेलार यांनी वादाची 'ट्युबलाइट' पेटवली आहे. चर्चा तर होणारच. अर्थात ती नाही झाली तरी शेलार यांचा कार्यभाग फक्त एका ट्विटमुळे साधला गेला आहे, हे कमी आहे का?  हे ही वाचा- 

  सलमानच्या घरासमोरील शौचालय हटवण्यास प्रशासनाचा नकार  डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)'ट्युबलाइट''मुळे 'दंगल'

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.