Advertisement

कॅप्टन कूलनं, अशी मारली पाचर!


कॅप्टन कूलनं, अशी मारली पाचर!
SHARES

(कथेचा उत्तरार्ध...)
स्थळ – टीम इंडियाची ड्रेसिंग रूम
कोच आणि टीममधील खेळाडूंची मीटिंग सुरू...
टॉस जिते तो पहले बॅटिंग करेंगे और बडा टार्गेट देंगे... बाद में उन्हे जल्दी आऊट करेंगे...
(सर्व हातावर हात ठेवून 'इंडिया-इंडिया'चा जयघोष)
स्थळ – पीचवर टॉससाठी दोन्ही कॅप्टन, अंपायर आणि समालोचक...
टॉस जिंकून टीम इंडियाने पहिली बॉलिंग घेतली...
(ड्रेसिंग रूममध्ये सर्वजण अवाक्...)

पुढचं तुम्हाला सर्व माहीतच आहे असं गृहीत धरतो... आता यामागच्या खऱ्या नारदाची (काल्पनिक) कथा सांगतो, ती नीट वाचा... आणि पटलं तर पुढे फॉरवर्ड करा किंवा शेअर करा...

एम. एस. धोनी पिक्चरमधला सीन आठवतोय का? पिक्चरमधला सुशांत सिंह ऊर्फ धोनी टीम मॅनेजमेंटला सांगतो, वर्ल्ड कपची तयारी करायची असेल तर टीममधील काही सीनियर खेळाडूंना काढावंच लागेल.

पिक्चर तुफान हिट झाला. पण तेव्हाचे तरुण तुर्क आज सीनियर झाले आणि आजच्या टीम इंडियातील सीनियर खेळाडूंची पण हीच अवस्था झाली आहे. तिथे सेहवाग, द्रविड वगैरे होते. इथे धोनी, युवराज वगैरे वगैरे आहेत. म्हणजेच, थोडे अधिक स्मार्ट, तोंडावर फटकळ वगैरे नसलेले आणि स्वतःची इमेज बिल्डिंग करणारे, तसंच मीडिया सॅव्ही छबी असलेले...

सेहवाग वगैरेंवर आलेली वेळ कधीतरी आपल्यावरही येणार हे या माजी कॅप्टनला माहीत होतंच. त्यामुळे त्याने कॅप्टन्सी सोडून खेळावर लक्ष केंद्रीत करण्याची खेळीही खेळलीच होती. पण, बॅटिंगमध्ये तसेच हेलिकॉप्टर शॉट्ससारख्या आक्रमकतेला धोनीचे वय आड येऊ लागले. त्यातच लाडका कोच शास्त्री जाऊन कुंबळे आल्याने भविष्य अंधारमय दिसू लागलं होतं... जाहिरातींची करोडोंची काँट्रॅक्ट रद्द होण्याची भीती जाणवू लागली होती. अर्थात, विकेट किपिंगमुळे तो अजूनही टिकला असला तरी तरुण पर्याय बरेच पुढे येत असल्याने करिअरची चिंता भेडसावणं स्वाभाविकच होतं. दुसरीकडे, युवराजही आजारपणानंतर कमबॅक करत असला, तरी म्हणावं तितका ग्रेट परफॉर्मन्स करू शकत नव्हता. फिल्डिंग असो किंवा त्या सहा सिक्सरची बरसात असो, जुना युवी काही जाणवत नव्हता. अर्थात, नाव आणि पूर्वपुण्याईच्या जोरावर जेवढी मजल मारायची तेवढी मारणारच ना! त्यानंतर मात्र, बोर्डाकडूनच धोनीला त्याच्याच पद्धतीने सीनियर म्हणून विश्राम घेण्याचे सुचवण्यात आले होते. आणि, त्यानुसार त्याने कॅप्टन्सी सोडली खरी. पण, खेळाडू म्हणून मिळणाऱ्या मलिद्यावर पाणी सोडणं थोडं जड जाऊ लागलं होतं.


मग ठरला एक गेमप्लॅन!

हे सर्व जाणूनच या जोडगोळीने खेळात राजकारण्यांनी आलेल्या पॉवरफुल्ल राजकारणाचाच आधार घ्यायचं ठरवलं. आणि मॅच जिंकण्यासाठी वापरले जाणारे डावपेच आपली इनिंग लांबावी म्हणून आखले जाऊ लागले. टीमचा बेस्ट कॅप्टन कूल असणारा बेस्ट कळलाव्या नारद ठरणार, यावर जणू काही शिक्कामोर्तबच झालं होतं. त्यांच्या रणनीतीमध्ये बाहेर बसून पपेट शो हँडल करण्याची पहिली खेळी होती. त्याचे पहिले पपेट ठरले ते सध्याचे कोच आणि कॅप्टन. वर्षभरापूर्वी एकमेकांचे कौतुक करणारे कुंबळे आणि कोहली आता एकमेकांना पाण्यात पाहू लागले होते. तसेच, मीडियामध्येही दोषारोप हेच दोघे करू लागले तसेच मीडियाही यांनाच व्हिलन बनवू लागला.


असं काय घडलं होतं वर्षभरात?

कुंबळे आणि कोहलीचं गूळपीठ जमलं तर होतं, पण दोघंही तसे इगोस्टिकच. त्यामुळे, दोघांमध्ये बेबनाव निर्माण करणं तसं कठीण नव्हतं. कुंबळे थोडा शांत, कमी बोलणारा तर कोहली दिल्लीचा म्हणजे बोलण्यात फटकळ आणि थोडासा आगाऊच. पण दोघांचीही क्रिकेटविषयीची निष्ठा एकसारखीच. त्यातच क्रिकेटमधले एकेकाळचे 'फॅब्युलस फाइव्ह' आता नव्या टीमसाठी 'फँटॅस्टिक फाइव्ह' (सचिन, सौरव, लक्ष्मण, द्रविड आणि सेहवाग) ठरू लागलेत. त्यात सेहवागची जागा कुंबळेने घेतली असली तरी भारतीय क्रिकेट एव्हरेस्टसारखे भासू लागले होते. अर्थात, सेहवागही लवकरच पाचचे सहा करणार यात शंका नाही. पण, यामुळे धोनी, युवराज आणि त्यांच्या पपलूंचे (जडेजा वगैरे) काय होणार ही चिंता होतीच. हा धोका लक्षात घेऊनच हुश्शार माहीने वर्षभरापासून कॅप्टन आणि कोचमध्ये दरी वाढवायला सुरुवात केली होतीच. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची शेवटची टेस्ट निमित्त ठरली. कोहली जायबंदी झाल्यानं कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि कुंबळेनं चायनामेन बॉलर कुलदीप यादवला खेळवलं आणि तेही विराटच्या जागी... कुंबळे तर वृषभ पंतलाही खेळवायच्या विचारात होता. विराटच्या दिल्लीचाच पोरगा असल्याने धोनीला बसवून त्याला खेळवण्यासाठी विराटही थोडाफार अनुकूल होता. हाच धोका लक्षात आल्याने धोनी आणि टीमने कोहली, तसंच कुंबळे यांच्यातच पाचर मारण्याचे काम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केले.

त्यानंतर प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींमध्ये विराटचे कान भरणे...आणि तोंडाने फटकळ पण हलक्या कानाच्या कॅप्टनची मॅच्युरिटी तिथे कमी पडली... त्यानंतर घडलं ते पुढचं रामायण! अर्थात, यात दुसऱ्याच्या काठीने तिसऱ्याचा साप मरणार आणि कॅप्टन्सीही पुन्हा सुपर कूलकडेच येणार, असाही गेम होता. त्यासाठीच पीचवर विराटकडून वारंवार सल्ले मागण्याच्या बातम्या करवून घेतल्या गेल्या. अर्थात, यास विराटही तितकाच जबाबदार आहे. खेळाडू म्हणून सचिनला आदर्श मानणाऱ्या विराटने कॅप्टन म्हणून किमान धोनीचा आदर्श घ्यायला हवा होता. म्हणजे, त्याच्या आक्रमकतेला स्मार्टनेससह कूलनेसचीही जोड मिळाली असती आणि हे डावपेच आधीच लक्षात आले असते.

पण दिल्लीकर कोहली तिथेच चुकला. हलक्या कानांनी घात केला आणि पाकविरोधातल्या मॅचमध्ये इगो श्रेष्ठ ठरला आणि मॅच हरली गेली.

आता वेस्ट इंडिजमध्ये कितीही चांगला खेळ केला तरी कोहली व्हिलन ठरल्याने त्याच्या इमेजला तडा गेलाय. कोचविना टीम विस्कटायचीही भीती आहे. ड्रेसिंग रूममधलं वातावरण तर नक्कीच तंग आहे. त्यातच जुने खेळाडूही टीका करत आहेत. त्यामुळे, वाढत्या प्रेशरमुळं कुकरच फुटायची भीती आहे. अर्थात, अजिंक्य, कुलदीप वगैरेंचा खेळ उंचावला तरी धोनी, युवराज, जडेजा, अश्विनलाही खेळात सातत्य ठेवावेच लागणार आहे. नाहीतर, गेमप्लान उलटायला वेळ लागणार नाही.

तेव्हा, येत्या काळात विराटची कॅप्टन्सी गेली नाही, तरी तिला डाग लावण्यात टीम धोनी यशस्वी ठरली आहे. आणि विराटची विकेट गेली तर धोनीशिवाय पर्याय नाही असं दाखवण्याचाही जोरदार प्रयत्न होईल आणि त्यात शास्त्रीपासून आणखी काही नावं पुढे असतील.
- स्वप्नील सावरकर

(अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना - वरील कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून त्यातील नावे व संदर्भ तंतोतंत जुळले तरी खरे मानायची गरज नाही.)

स्वप्नील सावरकर यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा