मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास सांगणारे राज्यातील गड-किल्ले महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा समजला जातो. परंतु हेच गड-किल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याचा घाट राज्य सरकारने घाटल्याचं पुढं आल्याने विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर चांगलीच आगपाखड केली आहे.
हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी राज्यातील २५ गड-किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. या वृत्तानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
मंत्रीमंडळाने ३ सप्टेंबर रोजी या धोरणाला संमती दिली होती. हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा (MTDC)नं राज्य सरकारच्या मालकीच्या २५ गड-किल्ल्यांची निवड केली आहे. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी या किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याची तयारी झाल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांने दिल्याचं या वृत्तपत्राने म्हटलं आहे.
हे वृत्त प्रसिद्ध होताच विरोधकांनी या निर्णयावर कडाडून प्रहार करायला सुरूवात केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आ. जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी 'गडकिल्ल्यांना हात लावाल, तर याद राखा', अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांना बजावलं आहे.
तर, दुसरीकडे राज्यातील गड-किल्ले भाड्याने देणारं वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.
हेही वाचा-
जागावाटपात भाजपा वरचढ, शिवसेनेला ११० जागांची आॅफर?
विधानसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचा १२५-१२५ फॉर्म्युला