नवीन प्रकल्पांना स्थगिती, नगरविकास विभागाचे आदेश

फडणवीस सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या कामांचा फेरआढावा घेत असताना राज्य सरकारने सुरूवात न झालेल्या नव्या विकासकामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश गुरूवारी नगरविकास विभागाने काढले आहेत.

मुख्यमंत्रीपदाचा भार स्वीकारताच उद्धव ठाकरे यांनी सर्वात पहिल्यांदा मेट्रो ३ आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. त्यानंतर बुलेट ट्रेन, मुंबई सागरी सेतू, मेट्रो, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग अशा प्रकल्पांचा फेरआढावा घेऊन त्यातील जनतेला आवश्यक प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. तसंच कुठल्याही प्रकल्पांना सूडबुद्धीने स्थगिती देण्यात येणार नाही, असंही स्पष्ट केलं होतं. 

हेही वाचा- बुलेट ट्रेन म्हणजे पांढरा हत्ती, छगन भुजबळ यांची भूमिका

त्यापाठोपाठ आता नगरविकास विभागामार्फत राज्यातील महापालिका, नगरपालिकांना विविध विकास कामांसाठी देण्यात आलेल्या निधीपैकी ज्या विकासकामांची सुरुवात झालेली नाही, ज्या विकासकामांच्या कार्यारंभाचे आदेश वितरित झालेले नाहीत, अशा कामांना पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत. अशा कामांबाबतची यादी ६ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात यावी. यात कुचराई केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असंही नगरविकास विभागाने स्पष्ट केलं आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या