वैद्यकीय प्रवेशाचा तिढा कायम, विद्यार्थ्यांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरूच

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळल्यानंतर पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांची फी भरण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. परंतु या आश्वासनानंतरही विद्यार्थ्यांनी आझाद मैदान इथं आपलं आंदोलन सुरूच ठेवलं आहे. 

 

काय आहे प्रकरण?

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आॅक्टोबर २०१८ मध्ये आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. त्यासाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये परीक्षा होऊन अभ्यासक्रम निवडीची प्रक्रिया सुरू असताना मार्च २०१९ मध्ये राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा नवा कायदा लागू केला. संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया आधीच सुरू झाल्याने काही विद्यार्थ्यांनी या आरक्षणाला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

 

आरक्षणाला स्थगिती

त्यानुसार मुंबई उच्च विद्यापीठाच्या नागपूर खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करताना पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया आधीच सुरू झाल्याने राज्य सरकारने मराठा आरक्षण यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू न करता पुढील वर्षापासून सुरू करावं, असं म्हणत आरक्षणाला स्थगिती दिली. 

 

याचिका फेटाळली

या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सरकारची याचिका फेटाळून लावल्याने ही स्थगिती कायम राहिली. परिणामी राज्य सरकारची पहिली यादी रद्द झाली. यामुळे राज्य सरकारवर विश्वास ठेवून राखीव कोट्यातून प्रवेश अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा खुल्या वर्गातून अर्ज भरण्याची वेळ आली, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सरकारने फसवणूक केल्याची भावना निर्माण झाली आहे. 

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आक्रोशानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालत पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची फी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून भरण्याचं आश्वासन दिलं. परंतु या आश्वासनावरही विद्यार्थी नाराज आहेत. 

 

फी नको, जागा द्या

सरकारने खुल्या प्रवर्गातून जागा वाढवून दिल्या, तरी आम्हाला चांगल्या काॅलेजात प्रवेश मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. आम्हाला खासगी काॅलेजात प्रवेश घ्यायचाच नाही. तर सरकारच्या फी भरण्याच्या आश्वासनाचा काहीही उपयोग नाही. आम्हाला फी नकोय तर जागा पाहिजेत, अशी मागणी करत या विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आपलं आंदोलन सुरूच ठेवलं आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतीबाबत विचार करण्यासाठी लवकरच मुंबईतील शिवाजी मंदिरात मराठा मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडणार आहे.


हेही वाचा-

वैद्यकीय प्रवेश: राज्य सरकार भरणार मराठा विद्यार्थ्यांची फी

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती


पुढील बातमी
इतर बातम्या