म्हणून अर्णब गोस्वामीला जामीन, सर्वोच्च न्यायालयाने केलं स्पष्ट

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना जामीन देण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून लावत सत्र न्यायालयात जाण्यास सांगितलं होतं. उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या या निर्णयाला अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाकडून चूक झाल्याचं निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं तसंच अर्णब गोस्वामी यांच्यासोबत इतर दोन आरोपींची प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश  ११ नोव्हेंबर रोजी पोलिसांना दिले होते.

हेही वाचा- अखेर अर्णब गोस्वामींंना जामीन मंजूर

त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना जामीन देण्यामागील कारण स्पष्ट केलं. अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार प्राथमिकदृष्ट्या अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचे आरोप सिद्ध होत नाहीत, एखादा आरोपी पुराव्यांमध्ये छेडछाड करू शकतो, पळून जाऊ शकतो किंवा आणखी गुन्हा करण्याची शक्यता असेल, या बाबी तपासूनच त्यानुसार आरोपीला तुरुंगात ठेवायची गरज आहे की नाही, यावर निर्णय घेता येतो. एखाद्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यांला बाधा येत असेल, तर हा त्याच्यावर झालेला अन्याय असेल, असं न्यायालयाने नमूद केलं. 

शिवाय फौजदारी कायद्यांचा वापर छळवणुकीसाठी होऊ शकत नाही असं म्हणताना मुंबई उच्च न्यायालय जोपर्यंत अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर निर्णय देत नाही, तोपर्यंत त्यांचा अंतरिम जामीन कायम असेल, असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.

(supreme court clarifies over arnab goswami bail in anvay naik suicide case)

हेही वाचा- जेलमध्ये अर्णब वापरत होता फोन, दोन पोलिस निलंबित
पुढील बातमी
इतर बातम्या