महाराष्ट्रात पुन्हा कठोर लाॅकडाऊन? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, वाचा..

राज्य सरकार पुन्हा एकदा कठोर लाॅकडाऊन जाहीर करणार असल्याच्या चर्चांना सध्या उत आला आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात लाॅकडाऊनविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्वांवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने खुलासा करण्यात आला आहे. या खुलाशात राज्य सरकारकडून पुन्हा कठोर लाॅकडाऊन लादण्यात येणार की नाही, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. 

देशव्यापी लाॅकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात (Lockdown 5.0) महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील जनतेला अनेक सवलती देण्यात आल्या. अर्थव्यवस्थेला हळुहळू गती देण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत खासगी कार्यालयं १० टक्के मनुष्यबळासह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. दुकाने, बाजारपेठा सम-विषम पद्धतीने पूर्ण क्षमतेने चालवण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली. व्यवसाय, उद्योगधंदे चालवणारे, नोकरदार, कर्मचाऱ्यांना आपल्या कामाधंद्याच्या ठिकाणी जाणं-येणं सोईचं व्हावं म्हणून मुंबई महानगर परिसरात प्रवासाला देखील मुभा देण्यात आली आहे.

मात्र सरकारने लाॅकडाऊन शिथिल करताच रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये पुन्हा एकदा गर्दी होऊ लागली आहे. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन होत आहे. बेस्ट बसमध्ये पूर्वीइतकीच रेटारेटी सुरू आहे. बहुतेक जण खासगी वाहनांनी आपापल्या कार्यालय, व्यवसायाकडे जात असल्याने रस्त्यावरही वाहतूककोंडी होऊ लागली आहे. अशा स्थितीत कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आणखी वाढल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा- तर पुन्हा लाॅकडाऊन करावं लागेल, उद्धव ठाकरेंचा इशारा 

या सर्व परिस्थितीकडे पाहता ही शिथिलता जीवघेणी ठरू शकते असं वाटलं तर नाईलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागेल, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला. कडाऊन शिथिल झाल्यावर पहिल्या दिवशी जी काही झुंबड उडाली, ती झुंबड बघितल्यानंतर थोडी धाकधूक वाटली. सरकारने आरोग्य सुधारण्यासाठी मैदानं किंवा इतर ठिकाणी फिरायला जाण्याची, व्यायाम करायला परवानगी दिलेली आहे, आरोग्य खराब करायला नाही. कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही, अजूनही हा लढा संपलेला नाही. त्यामुळे गर्दी टाळा, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कठोर लाॅकडाऊन जारी करण्यात येईल, असं म्हटलं जाऊ लागलं. त्यावर खुलासा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. पण जनतेला विनंती आणि आवाहन आहे की कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या, अशी विनंती त्यांनी केली आहे.

हेही वाचा- केंद्राकडे मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची सातत्याने मागणी- उद्धव ठाकरे
पुढील बातमी
इतर बातम्या