घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नका, उद्धव ठाकरेंचा मनसेला टोला

भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns rally) मुंबईत मोर्चा काढणार आहे. परंतु ही भूमिका शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची असून उगाच त्याचं श्रेय कुणी घेऊ नये, असं म्हणत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मनसेचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला हाणला. 

सामनाचे संपादक संजय राऊत (sanjay raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना भारतात राहणाऱ्या घुसखोरांवर प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे मनसेच्या भूमिकेवर निशाणा साधला. 

हेही वाचा- मनसेच्या मोर्चाचा मार्ग ठरला, ‘या’ मार्गावरून घुसखोरांविरूद्ध करणार आंदोलन

भारतात राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी (bangladeshi and pakistani) घुसखोरांना हाकलून दिलं पाहिजे, या भूमिकेशी आपण ठाम आहात का? असा प्रश्न राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला, त्यावर ठाकरे म्हणाले, का ठाम असू नये? घुसखोर हा घुसखोरच असतो. त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करता येणार नाही. मुळात घुसखोरांना हाकला ही भूमिका बाळासाहेबांची (bal thackeray) आहे. यांनी उगाच श्रेय घेऊ नये. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला हाणला आहे. 

बाळासाहेबांनी ही भूमिका आधीच ठामपणे मांडली आहे. ही नवीन भूमिका नाही. पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हाकलावं लागेल. कोणी अडवलंय तुम्हाला?" असं म्हणत केंद्र सरकारला देखील ठाकरे यांनी आव्हान दिलं.

दरम्यान, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत मोर्चा (rally) काढणार आहे. या मोर्चामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केल्याने भायखळा ते आझाद मैदान मार्गाऐवजी मरीन ड्राइव्ह ते आझाद मैदान या मार्गावर मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा- हे माझं हिंदुत्व नाही, मुख्यमंत्र्यांत्र्यांचा भाजपला टोला

पुढील बातमी
इतर बातम्या