'मल्ल्याला चोर म्हणणं चुकीचं' या वक्तव्यानंतर गडकरींनी कशी केली सारवासारव?

''एखाद्या वेळेस कर्ज फेडण्यात अपयशी झालेल्या मल्ल्या यांना चोर म्हणणं चुकीचं आहे.'' असं म्हणत विजय मल्ल्याची पाठराखण करणं गडकरींच्या चांगलंच अंगलट आलं आहे. प्रसार माध्यमांसहित देशभरातून गडकरींवर टिकेचे बाण सुटल्यानंतर अखेर आपण व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्येसंदर्भात बोललो होतो, असा खुलासा त्यांना करावा लागला.

भारतीय बँकांना ९,५०० कोटींहून अधिक रुपयांना गंडवून लंडनमध्ये पळ काढणारा तथाकथित मद्यसम्राट विजय मल्ल्या याला भारतीय तपास यंत्रणांनी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत फरार घोषित केलं आहे. याप्रकरणी लंडन न्यायालयाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली आहे.

काय म्हणाले होते गडकरी?

यासंदर्भात एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, ''मल्ल्या यांना दिलेल्या कर्जाची परतफेड त्यांनी न चुकता केली. ४० वर्षे ते नियमीतपणे व्याज भरत होते. परंतु पदेशात गेल्यावर ते अडचणीत आल्यानंतर एकाएकी चोर कसे काय ठरले. ज्यांनी ५० वर्षे कर्ज फेडले, परंतु केवळ एकदाच डिफाॅल्टर ठरले... तर ते फ्राॅड कसे काय झाले? ही मानसिकता योग्य नाही.''

'असा' केला खुलासा

गडकरी यांच्या या वक्तव्यावर गदारोळ झाल्यानंतर अखेर त्यांना खुलासा करावा लागला. ते म्हणाले, ''महाराष्ट्र सरकारच्या सिकाॅम संस्थेने मल्ल्याला दिलेलं कर्ज त्यांनी नियमीतपणे फेडलं होतं. कुठल्याही व्यवसायात जोखीम असतेच. उद्योगपतींना व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागतो, अशावेळेस त्यांची पाठराखण केली पाहिजे. परंतु उद्योगातील मंदी आणि आर्थिक फसवणूक यांत अंतर आहे. नोकऱ्या वाचवण्यासाठी मंदीच्या काळात उद्योजकांचं संरक्षण केलं पाहिजे असं माझं म्हणणं होतं. आर्थिक फसवणुकीला माझा कुठलाही पाठिंबा नाही आणि माझे मल्ल्यांसोबत कुठलेही व्यावसायिक संबंध नाहीत.''


हेही वाचा-

आर्थररोड कारागृहातील कसाबची बॅरेक मल्ल्यासाठी रिकामी

मुद्दल देईल, पण व्याज देणार नाही, विजय मल्ल्याची कर्ज फेडण्याची तयारी


पुढील बातमी
इतर बातम्या