हॅकर शुजाचा दावा निवडणुक आयोगानं फेटाळला

भारताच्या ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतात आणि त्या तशा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हॅक झाल्या आहेत. तर ईव्हीएम मशिन हॅक झाल्याची माहिती गोपीनाथ मुंडे यांना होती. त्यामुळेच गोपीनाथ मुंडेची हत्या झाल्याचा गंभीर खुलासा करत अमेरिकेतील एका हॅकरने, सय्यद शुजा यांनी भारतासह देशभरात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या या खळबळजनक आरोपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं ईव्हीएम मशिन हॅक होत नसल्याचं स्पष्ट करत शुजाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हॅकरच्या लंडनमधील पत्रकार परिदषदेला हजर होते. त्यामुळे हा काँग्रेसकडून भारताला आणि भाजपाला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपाकडून होत असून यावरून आता चांगलंच राजकारण तापलं आहे.

लंडनमध्ये गुप्त पत्रकार परिषद

शुजा हा सायबर एक्सपर्ट असून सध्या तो अमेरिकेत आहे. सोमवारी लंडनमध्ये गुप्तपणे काॅन्फरन्सद्वारे पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हणत भारतातील अनेक राष्ट्रीय पक्षांनाही पत्रकार परिषदेचं निमंत्रण दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र काँग्रेसचे कपिल सिब्बल वगळता कुणाही या पत्रकार परिषदेला हजेरी लावली नव्हती. दरम्यान या पत्रकार परिषदेत शुजाने अनेक गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. भारतातील ईव्हीएम मशिनवर विरोधी पक्षांसह अनेकांकडून सुरूवातीपासूनच संशय व्यक्त होत असताना सोमवारच्या पत्रकार परिषदेत शुजानं भारताच्या ईव्हीएम मशीन हॅक होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

म्हणून गोपीनाथ मुंडेचा घात?

ईव्हीएम मशीन हॅक होत असल्याच्या आरोपाबरोबरच शुजानं आणखी एक गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. तो म्हणजे ईव्हीएम मशीन हॅकबद्दल माहिती मिळाल्यानेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप. शुजाच्या या दोन्ही आरोपांमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. महत्त्वाचं म्हणजे २०१५ च्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही ईव्हीएम मशीन हॅक होणार होतं. पण भाजपाच्या आयटी सेलकडून ट्रांसमिशन सापडल्यानं हा प्रकार रोखता आला. त्यामुळेच दिल्लीत भाजपाचा पराभव झाला असंही शुजानं स्पष्ट केलं आहे.

धनंजय मुंडेकडून चौकशीची मागणी

शुजाचे हे आरोप भाजपासह निवडणुक आयोगानं फेटाळले आहेत. भारतीय ईव्हीएम मशीन हॅक होत नसून ईव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे. तर भाजपानंही काँग्रेस मोदीला-भाजपाला हटवण्यासाठी अशाप्रकारची बदनामी करत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची राॅ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी धनंजय मुंडे या प्रकरणाचं राजकारण करू पाहताहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे.


हेही वाचा -

करिना कपूर निवडणुकीच्या रिंगणात?

नारायण राणेंची घरवापसी?


पुढील बातमी
इतर बातम्या