अंमली पदार्थ सेवनाविरोधात स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार - अनिल देशमुख

अंमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी कायदेशीर कठोर उपाययोनांबरोबरच जनजागृतीही महत्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येईल. स्वयंसेवी संस्थाचीही जनजागृतीसाठी मदत घेण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानसभेतील  सदस्य अनंत गाडगीळ यांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून तरुणाईला रोखण्याच्या उपाययोजनांविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना देशमुख बोलत होते. 

हेही वाचाः-  ​गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा बोटीचा प्रवास महागला​​​

अंमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी कार्यशाळा, जनजागृती पंधरवडा, जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन शासन स्तरावर करण्यात येणार आहे. दरवर्षी २६ जुन या दिवशी राज्यातील शाळा व स्वयंसेवी संस्थामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन अंमली पदार्थ विरोधात जनजागृती केली जाते. मात्र या पुढे संपूर्ण आठवडाभर राज्यातील विविध शाळांमध्ये ही जनजागृती केली जाणार आहे. त्याच बरोबर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात फास आवळण्याचे आदेश देशमुख यांनी पोलिसांना दिले आहे. 

हेही वाचाः- ​Exclusive बर्वेंच्या कारवाईवर परमबीर सिंहांची स्थगिती, ‘या’ अधिकाऱ्यांचं केलं भलं​​​

भारतात नार्कोटिक ड्रग्स ॲण्ड सायकोट्रॉपिक सबटंन्स ॲक्ट १९८५ (एनडीपीएस) हा अंमली पदार्थ विरोधी कायदा आहे. या कायद्यांतर्गत अमली वस्तू किंवा औषधाचे उत्पादन, वितरण, सेवन, विक्री, वाहतूक, साठा, वापर, आयात-निर्यात यावर देशात बंदी आहे. प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय विभागाने उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. राज्यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांनी २६ जून या दिवशी आपल्या परिसरातील शाळा व स्वयंसेवी संस्थांमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईसह गावात शाळामधून अंमली पदार्थ विरोधी फेरी काढणे, अमली पदार्थावर बंदी याविषयी निबंध स्पर्धा आयोजित करणे, व्यसनमुक्ती हीच राष्ट्रभक्ती याविषयी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे, अंमली पदार्थावर पथनाट्याचे आयोजन करणे, अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करणे, अंमली पदार्थाच्या सवयी सोडविण्यासाठी या दिवशी निर्धार प्रतिज्ञा देणे आदी कार्यक्रमांचे आठवडाभर आयोजन केले जाणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या