आता राणेंच्या रुग्णालयाचं उद्घाटन सोनिया करणार का?

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि अगदी माध्यमविश्वात राजकीयदृष्ट्या अस्वस्थ असलेले नारायण राणे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. नारायण राणे आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात नेमकी भेट झाली की नाही? झालीच तर त्यात नेमकं काय ठरलं? ‘रोखठोक’ राणे नेमकं काय लपवत आहेत? आणि का? या प्रश्नांच्या उत्तरांचे नवनवे पतंग उंचच उंच उडत असताना ‘मुंबई लाइव्ह’ला मात्र राणेंच्या अहमदाबाद भेटीच्या बातमीमागची बातमी वाचकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटतं. नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे हे अहमदाबाद दौऱ्यावर पित्यासोबत होते. “आमचा अहमदाबाद दौरा हा सिंधुदुर्गातल्या रुग्णालयासंबंधी कामासाठी होता.” या नितेश राणे यांच्या वक्तव्याकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही. नितेश यांचं विधान पूर्णसत्य नसलं तरी असत्य नाही, हे नक्की. सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या अद्ययावत रुग्णालयाचं बांधकाम पूर्णत्वाकडे पोहोचलं आहे. लवकरच या रुग्णालयाचं उद्द्घाटन होणार आहे. उद्घाटक आहेत काँग्रेसअध्यक्षा सोनिया गांधी. नारायण राणे यांनी सोनिया गांधी यांना रुग्णालयाच्या उद्घाटनाचं रीतसर निमंत्रण दिलं आहे आणि सोनिया गांधी यांनी ते स्वीकारलंही आहे ! प्रकृतीअस्वास्थ्यामुळे सोनिया गांधी आपला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्दही करू शकतात. मात्र तसं झाल्यास त्याचा थेट संबंध नारायण राणे यांच्या नाराजीशी लावला जाऊ शकतो.

हॉटेल व्यवसायात स्थिरावलेल्या राणे परिवाराचं ‘ड्रिम प्रोजेक्ट’ आहे कोकणातलं अद्ययावत रुग्णालय. काँग्रेसच्या सत्ताकाळात मंत्रिपदावर असल्यापासून नारायण राणे यांनी आपल्या दोन्ही पुत्रांसह या रुग्णालयासाठी उपयुक्त माहिती मिळवण्याच्या उद्देशाने देश-विदेशात भटकंती केली आहे. रुग्णालयाचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलेलं असताना काही महत्त्वाच्या सरकारी परवानग्या रखडल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, रस्त्यातला अडसर दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सहकार्य पुरेसं नाही. महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाची मध्यस्थीही गरजेची आहे. अर्थात भाजपाश्रेष्ठी, राज्याचे मुख्यमंत्री आणि खुद्द नारायण राणे हे मान्य करणार नाहीत. असो, राणे यांच्या अहमदाबाद दौऱ्या त त्यांची अमित शहा यांच्याशी संभाव्य भाजपाप्रवेशाच्या नियम, अटींवर चर्चा झाली असावी तशीच ती नितेश राणे यांच्या दाव्यानुसार, रुग्णालयासंदर्भातसुद्धा झाली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

तूर्त नारायण राणे यांना आपली महत्त्वाची राजकीय खेळी खेळायची आहे. राणे यांनी पक्षांतर केलं तरीही एक कळीचा प्रश्न उरतोच. कोकणातल्या त्यांच्या अद्ययावत रुग्णालयाचं उद्घाटन कोण करणार? उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रमुख पाहुण्यांचं नाव बदलणार का? हा खरंतर उत्कंठा वाढवणारा प्रश्न आहे. उत्तर 'नारायण'च जाणोत.


नारायण राणेंच्या संभाव्य शिवसेना प्रवेशावर 'मुंबई लाइव्ह'ने दिलेली बातमी

फायरब्रँड नेत्याचं शिवसेनेत 'कमबॅक'?


नारायण राणेंसमोरच्या दुसऱ्या सबळ पर्यायाची सर्वप्रथम 'मुंबई लाइव्ह'नं दिलेली बातमी

राणेंना मुहूर्त मिळाला ?


पुढील बातमी
इतर बातम्या