Advertisement

राणेंना मुहूर्त मिळाला ?


राणेंना मुहूर्त मिळाला ?
SHARES

मुंबई - आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षत्याग करण्याचा त्यांचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. पण राजकारणात मुरलेल्या नारायण राणे यांनी ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांना शिवसेनेत धाडण्याचा धाडसी प्रयोग करायचा ठरवला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. वातावरण आजमावून पाहत योग्य वेळी काँग्रेस त्यागाच्या बातमीचा 'मोठा फटाका' नारायण राणे फोडण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांना शिवसेनेत दाखल होण्याच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीचा. शिवसेनेतून बाहेर पडावं लागल्यानंतर गेल्या काही वर्षांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पराकोटीची टीका केली. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा नारायण राणे यांच्याशी थेट राजकीय शत्रुत्व जपलं. मात्र आता शिवसेनेची पुनर्बांधणी करायचा चंग उद्धव ठाकरे यांनी बांधला आहे. पक्षबांधणीच्या रणनीतीचा भाग म्हणून नारायण राणे यांना काँग्रेसमधून फोडून शिवसेनेत परत घेण्याचा पर्याय स्वीकारण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांच्याशी उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले गेलेल्या एका विधान परिषद सदस्याची दोन वेळा बैठक झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत राणे यांच्या परतीबाबतच्या ‘अटी-शर्तीं’वर चर्चा झाली.

विशेष म्हणजे नारायण राणे यांच्यासमोर पक्षत्यागानंतर शिवसेना हा एकमेव पर्याय नाही. भारतीय जनता पार्टीत दाखल होण्याचा पर्यायही त्यांनी खुला ठेवला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपण भाजपा प्रवेशासाठीही अनुकूल असल्याचा संदेश राणे यांनी पोहोचवला आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नारायण राणे यांच्यासमोर भाजपा प्रवेशाच्या बदल्यात राज्याच्या महसूलमंत्रीपदाची ऑफर ठेवली होती. महत्त्वाकांक्षी राणे यांनी ती नाकारली होती. पण आज भाजपाचं पारडं जड आहे. तूर्त अधिक जोर कुठे लावायचा? शिवसेना की भाजपा ? या विवंचनेत राणे आहेत. गुढीपाडव्याच्या पुढे-मागे त्यांना ‘विवंचनामुक्त’ होण्याचा मुहूर्त सापडण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांचे पुत्र, माजी खासदार निलेश राणे यांनी हाच स्पष्ट संकेत दिला आहे. मोठा निर्णय अंमलात आणण्यापूर्वी कोकणातल्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न निलेश राणे करत आहेत. प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप  करणा-या निलेश यांनी रत्नागिरीत दोन वर्षांहून अधिक काळ रिक्त असलेलं जिल्हाध्यक्षाचं पद भरण्यासाठी प्रदेशाध्यक्षांना 48 तासांची मुदत दिली आहे. पक्षत्यागापूर्वी योग्य वातावरण निर्मितीचं कसब चार दशकं राजकारणात काढलेल्या नारायण राणे यांना अवगत आहे. हेच कसब पणाला लावत आपण काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या पक्षातले आपले हितशत्रू पसरवत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. सोबत शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षांवर टिकेची धार परजत आपली 'काँग्रेसनिष्ठा' सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना नारायण राणे दिसत आहेत. दुसरीकडे, आपलं पक्षातलं उपद्रवमूल्य पुन्हा दाखवून देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ घालण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असल्याचं राजकीय विश्लेषकांचं निरीक्षण आहे.

राणे यांनी बंडाचं निशाण फडकवण्याची ही पहिलीच वेळ नाही. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राणे यांनी अनेकदा ‘बंड’ केलं, पण प्रत्येक वेळी ते ‘थंड’ झालं. यावेळी इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेतच नारायण राणे यांना पुढचं पाऊल टाकायचं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा