Advertisement

फायरब्रँड नेत्याचं शिवसेनेत 'कमबॅक'?


फायरब्रँड नेत्याचं शिवसेनेत 'कमबॅक'?
SHARES

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच भूकंप येण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणातलं ‘दादा’ व्यक्तिमत्त्व पक्षांतर करुन स्वगृही दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा त्यांच्या मतदारसंघात सुरु आहे. राज्यात भरधाव सुटलेला भाजपाचा वारु आपल्या कर्मभूमीत रोखणाऱ्या या नेत्याने आपली राजकारणातली सद्दी संपलेली नाही, हे अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दाखवून दिलं आहे. कधीकाळी शिवसेनेची ‘मुलुखमैदानी तोफ’ म्हणून ओळखल्या गेलेल्या या नेत्याने शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र आता त्यांना परतीचे वेध लागल्याचं सांगितलं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळच्या आक्रमक वृत्तीच्या या नेत्याने आता राजकीय धोरणाचा भाग म्हणून नरमाईचं धोरण स्वीकारायचं ठरवलं आहे. अर्थात काही केलं तरी शिवसेनेत पुन्हा प्रवेश करणं वाटतं तितकं सोपं नाही, याची त्यांना जाणीव आहे. म्हणून स्वपक्षाचे सुमारे 15 आमदार फोडून शिवसेनेत दाखल होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मध्यंतरी मोठं राजकीय वजन असलेल्या आध्यात्मिक गुरुंच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न फोल ठरला होता. आता वेगळ्या माध्यमातून त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरु केले आहेत.

सध्याच्या पक्षात मन रमत नसल्यामुळे काही महिन्यांपूर्वी या नेत्याने भाजपाप्रवेशाची चाचपणी करुन पाहिली होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या नेत्याच्या भाजपाप्रवेशासाठी अनुकूलही होते. मात्र शहा यांनी भाजपात येण्याच्या बदल्यात दिलेली ऑफर न भावल्यामुळे या महत्त्वाकांक्षी नेत्याने भाजपाकडे पाठ फिरवली. दुसरीकडे शिवसेनेत परतण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना आजही पक्षप्रमुख दाद लागू देत नाहीत, ही वस्तुस्थिती ठाऊक असली तरीही संघर्ष करण्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ज्येष्ठ नेता वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर प्रहार करत खडतर प्रवास सुकर करण्यासाठी सर्व डावपेच अवलंबून पाहणार आहेत, असा दावा त्यांचा समर्थक म्हणवणाऱ्या एका आमदाराने केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा