मृत्यूदर शून्यावर आणणं हेच लक्ष्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील शहरी भागांपासून सर्व जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या कोरोनाबाधितांवर योग्य आणि वेळेत वैद्यकीय उपचार झाले पाहिजेत. यामुळे कोरोनाबाधित रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढण्यासोबतच मृत्यू दरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे या वैद्यकीय सुविधा वाढवून कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणं हे सरकारचं एकमेव उद्दिष्ट असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. (zero mortality rate is the aim of maharashtra government during covid 19 pandemic says cm uddhav thackeray)

विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत.  

उपचारांत हवी समानता

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मृत्यू दर कमी नाही, तर शून्यावर आणणं हेच आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत तसंच त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसूत्रीपणा आणि समानता असणं आवश्यक आहे. म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

हेही वाचा- मुंबईतील रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा कोरोनासाठी आरक्षित ठेवा, टास्क फोर्सची मोठी सूचना

मुंबईत उल्लेखनीय काम

मुंबईत टास्क फोर्सने चांगलं काम केलं आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहेत. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवलं, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णांचं मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे.

डाॅक्टरांचं मार्गदर्शन

डॉ. तात्याराव लहाने यांनी या बैठकीचं सूत्रसंचालन केलं. टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी यावेळी सांगितलं की, वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे दिली जातात त्याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावं. नको तिथे अनावश्यक औषधी देऊ नये. अडचण येईल तेव्हा तात्काळ आम्हाला संपर्क करा.

डॉ. राहुल पंडित म्हणाले, ही विशेष औषधे महत्त्वाची नाहीत, तर रुग्णांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. ऑक्सिजन उपलब्ध ठेवणं खूप आवश्यक आहे.

डॉ. शशांक जोशी, डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी देखील उपचारांविषयी जिल्ह्यांच्या डॉक्टर्स व शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली व शंकानिरसन केलं, उपचाराविषयी सूचना केल्या.

या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांचीही उपस्थिती होती. 

हेही वाचा- कोरोना लढ्यासाठी मुंबईतील ९ नामवंत डाॅक्टरांची टास्क फोर्स
पुढील बातमी
इतर बातम्या