ग्राहकांनो, गृहकर्जाचा हप्ता भरण्याच्या जाहिरातींना भुलू नका!

तुम्ही फक्त घर बुक करा, ताबा मिळेपर्यंत आम्ही गृहकर्जाचा हप्ता भरू, अशा जाहिराती रस्त्यारस्त्यावर, वर्तमानपत्रात झळकलेल्या दिसतात. पण ग्राहकांनो, अशा जाहिरातींना भूलू नका, असं सांगण्याची वेळ आली आहे. कारण या जाहिराती खोट्या निघत असून बिल्डर ग्राहकांची फसवणूक करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ती महारेराच्या एका निकालातून. घराचा ताबा न देता गृहकर्जाचा हप्ता ग्राहकांकडून वसूल करणाऱ्या अशाच एका बिल्डरला महारेरानं दणका दिला आहे. ग्राहकानं भरलेली संपूर्ण रक्कम व्याजासकट ग्राहकाला परत करण्याचे आदेश महारेरानं दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

भावेश श्रीवास्तव यांनी इप्टोम रेसिडेन्सी प्रा. लिमिटेड या बिल्डरच्या गोरेगाव पश्चिम येथील इम्पिरीयल हाईटस प्रकल्पातील ए विंगमधील ४३ मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ४३०१ बुक केलं. २० लाख रुपये भरत हे घर बुक करताना करारानुसार गृहकर्जाचा हप्ता ताबा मिळेपर्यंत बिल्डरकडून भरला जाईल, असं ठरलं. तर बिल्डरने ठराविक तारखेपर्यंत ताबा मिळेल असंही सांगितलं. प्रत्यक्षात काही ताबा मिळालाच नाही. घराचा ताबा न मिळाल्याने कर्जाचा हप्ता बिल्डरकडूनच जाणं अपेक्षित होतं.

रक्कम देण्यास टाळाटाळ

असं असताना श्रीवास्तव यांना बँकेकडून कर्जाचा हप्ता भरण्यासाठीचं पत्र आलं. तर बँकेकडून गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी वारंवार विचारणाही करण्यास सुरूवात झाली. त्यामुळं श्रीवास्तव यांनी घराचं बुकींग रद्द करत घराची भरलेली रक्कम परत करण्याची विनंती केली. पण बिल्डरनं ही विनंती धुडकावली. त्यामुळं श्रीवास्तव यांनी महारेराकडे धाव घेत बिल्डरविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीसंदर्भातील सुनावणीदरम्यान महारेरानं या बिल्डरला चांगलाच दणका दिला आहे.

महारेराचा निकाल काय?

घराचा हप्ता ताबा मिळेपर्यंत तुम्ही भरणार असताना मध्येच ग्राहकांना हप्ता भरायला लावणं हे कराराचं उल्लंघन आहे, ही ग्राहकाची फसवणूक आहे असं म्हणत महारेराने इप्टोम बिल्डरला दणका दिला आहे. श्रीवास्तव यांनी भरलेली घराची संपूर्ण रक्कम व्याजासकट परत करण्याचे आदेश महारेरानं दिले आहेत. महारेराच्या या आदेशामुळे विविध आकर्षक सवलतींच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करणार्या बिल्डरांना आता चाप बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा-

मंजूर आराखडे प्रकल्पाच्या दर्शनी भागात लावा, महारेराचे बिल्डरांना आदेश

मुंबईत राहतात सर्वाधिक श्रीमंत लोक; दिल्ली दुसऱ्या स्थानावर


पुढील बातमी
इतर बातम्या