'आपला वडापाव' विक्रीतून जवानांसाठी ७० हजार जमा!

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • समाज

आपल्या जिवाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर त्वेषाने लढणाऱ्या भारतीय जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबईतल्या 'आपला वडापाव'ने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. एक दिवस ५ रूपयात वडापाव विकून जमा झालेला निधी जवानांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा हा उपक्रम होता.

संकल्प पूर्ण

३० जानेवारी २०१८ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत जवानांच्या मदतीसाठी आपला वडापावचे मालक मंगेश अहिवळे यांनी केलेला संकल्प पूर्णही केला. या वडापाव विक्रीतून ७० हजार रुपये जमा झाले असून लवकरच तो जवानांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.

१४ हजार वडापावची विक्री

वडापाव विक्रीतून एकूण ७० हजार रुपये जमा झाले असून १४ हजार वडापाव विकले गेले आहेत. जवानांसाठी मदत म्हणून ७० हजार रुपयांचा चेक लवकरच संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे सुपूर्द केला जाणार असल्याचं 'आपला वडापाव'चे मालक मंगेश अहिवळे यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना सांगितलं.

५ रुपयांत विकला वडापाव

विशेष म्हणजे आपल्याला बाजारात १० ते १५ रूपयांना मिळणारा वडापाव 'आपला वडापाव'ने जवानांना मदत मिळावी म्हणून फक्त ५ रूपयांमध्ये विकला. या वडापाव विक्रीतून जमा झालेली संपूर्ण रक्कम लवकरच संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. त्यानंतर ही रक्कम जवानांसाठी दिली जाणार आहे.

एल्फिन्स्टनला वडापाव

याआधीही मुंबईचा हाच वडापाव अनेकदा मदतीसाठी धावून आला आहे. 'आपला वडापाव'ने असाच एक सामाजिक संदेश देत एल्फिन्स्टनमध्ये मृत पावलेल्या मयुरेश हळदणकरच्या कुटुंबाला ५ रुपयांमध्ये वडापाव विकून आर्थिक मदत केली होती. तर यंदा देखील देशाच्या जवानांसाठी ही मदत केली जाणार आहे. ३० जानेवारी रोजी एल्फिन्स्टन येथील सारथी हॉटेलजवळ वडापाव स्टॉल लावण्यात आला होता.


हेही वाचा - 

मुंबईत जवानांच्या मदतीसाठी ५ रुपयांत वडापाव

पुढील बातमी
इतर बातम्या