'आपला वडापाव' करणार मयुरेशच्या कुटुंबाला 'अशी'ही मदत

रेल्वेने चेंगराचेंगरीत बळी गेलेल्यांना आर्थिक मदत जाहीर केली खरी. पण ही मदत त्यांना कधी मिळेल? मिळेल की नाही? हे प्रश्नच आहेत. अशावेळी मयुरेशच्या कुटुंबाला जमेल तशी मदत करण्यासाठी एक हात पुढं आला आहे. या हाताचं नाव आहे वडापाव विक्रेता मंगेश अहिवळे.

SHARE

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत बीडीडी चाळीत राहणाऱ्या २१ वर्षांच्या मयुरेश हळदणकराचा बळी गेला. लहान वयात कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर उचलणाऱ्या मयुरेशचं जाणं बीडीडीकरांनाच नव्हे, तर समस्त मुंबईकरांच्या मनाला चटका लावणारं होतं. मयुरेशच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याच्या मागं कुटुंबाला सांभाळणारं कुणीही नाही. रेल्वेने चेंगराचेंगरीत बळी गेलेल्यांना आर्थिक मदत जाहीर केली खरी. पण ही मदत त्यांना कधी मिळेल? मिळेल की नाही? हे प्रश्नच आहेत. अशावेळी मयुरेशच्या कुटुंबाला जमेल तशी मदत करण्यासाठी एक हात पुढं आला आहे. या हाताचं नाव आहे वडापाव विक्रेता मंगेश अहिवळे.


सामाजिक बांधिलकी

मुंबईत वडापाव खाऊन दिवस काढणाऱ्यांची कमी नाही. गरीबांचं अन्न म्हणूनही वडापावची ओळख आहे. एकाबाजूला वाढत्या महागाईमुळं वडापावची किंमत दोन-अडीच रुपयांवरून १२-१५ रुपयांवर गेली असली, तरी गरीबांना वडापाव स्वस्तात मिळावा म्हणून अहिवळे आजही ५ रुपयांनाच वडापाव विकत आहेत. तो देखिल चविष्ट. परळ एसटी डेपोजवळ लागणारा अहिवळे यांचा 'आपला वडापाव' स्टाॅल गरीबांसाठी मोठा आधार. याच अहिवळे यांनी सामाजिक बांधिलकीचा उत्तम नमूना सादर करत हळदणकर कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचं ठरवलं आहे.


'अशी' करणार मदत

अहिवळे यांनी हळदणकर कुटुंबाला मदत करण्यासाठी आपल्या संपूर्ण दिवसाची कमाई देण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी त्यांनी एक दिवस ठरवला आहे. १४ आॅक्टोबरला सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत होणाऱ्या वडापाव विक्रीतून जी रक्कम जमा होईल, ती रक्कम मयुरेशच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अहिवळे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


वडापाव विकत घ्या, मदत करा

मयुरेशच्या कुटुंबाला मदत करण्याची अनेकांना इच्छा असेल, पण मोठी आर्थिक मदत शक्य नसल्याने अनेकांनी आखडता हात घेतला असेल. अशावेळी केवळ ५ रुपयांचा वडापाव विकत घेऊन, त्याच्या कुटुंबाला कुणालाही मदत करता येईल. मदत लहान असो वा मोठी मदत ही मदत असते. 'थेंबे थेंब तळे साचे' या म्हणीप्रमाणे मुंबईकरांनी १४ आॅक्टोबरला जास्ती जास्त संख्येने ५ रुपयांचा वडापाव खरेदी केल्यास हळदणकर कुटुंबाला चांगला आर्थिक हातभार लावता येईल, असं अहिवळे यांनी सांगितले.

आपला उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून अहिवळे सोशल मीडियाचाही आधार घेत आहे.


मयुरेशच्या कुटुंबाबद्दल प्रसिद्धी माध्यमांद्वारे माहिती मिळाल्यावर मी त्याच्या कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली. त्याच्या कुटुंबाची हालाखिची परिस्थिती आणि त्याचा मृत्यू मनाला चटका लावून गेला. त्यामुळे मी ठरवलं की आपण छोटीशी का होईना, पण हळदणकर कुटुंबाला मदत करायचीच. त्यातूनच वडापाव विक्रीची रक्कम त्यांना देण्याचं ठरवलं. मला खात्री आहे की, मुंबईकरही मोठ्या संख्येने वडापाव खरेदी करूत मयुरेशच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी नक्कीच पुढे येतील.

- मंगेश अहिवळे, आपला वडापाव, विक्रेतेहेही वाचा

सगळ्यांनी मिळून खोटं बोलायचं हीच भाजपाची वृत्ती - संदीप देशपांडे

एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटना: फुलासारख्या पोराचा जीव गेला, दुसरा कोमेजला

एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटना: ‘या’ ६ हातांनी वाचवले शेकडो प्रवाशांचे प्राणडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या