Advertisement

एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटना: फुलासारख्या पोराचा जीव गेला, दुसरा कोमेजला


एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटना: फुलासारख्या पोराचा जीव गेला, दुसरा कोमेजला
SHARES

दसऱ्याला फुलांची मोठी मागणी... त्यामुळे दसऱ्याच्या आदल्या दिवशी वडिलांना ताजी फुले आणून दिल्यास सणासुदीला चांगली कमाई होईल, या विचाराने विक्रोळीला राहणारे आकाश (१९) आणि रोहित परब (११) हे दोघेही भाऊ नेहमीप्रमाणे रेल्वेने दादरच्या फुल मार्केटमधून फुले आणण्यासाठी निघाले. दादरच्या तुलनेत सोईस्कर म्हणून एल्फिन्स्टन स्थानकावर उतरले. पण शुक्रवारच्या चेंगराचेंगरीत सापडून हे दोघेही जण चिरडले गेले. त्यात रोहितला प्राण गमावावा लागला, तर आकाश केईएम रुग्णालयात उपचार घेत आहे.

विक्रोळीतील टागोरनगर ५ मध्ये राहणारे अंकुश परब पत्नी आणि दोन मुलांसोबत फुले, हार विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत मेहनती कुटुंब अशी परब कुटुंबाची ओळख. कारण सकाळी आणि सायंकाळी हार फुले विकून संसाराचा गाडा हाकणाऱ्या वडिलांना मदत म्हणून दोन्ही मुले दादरच्या फुल मार्केटमधून फुले आणून द्यायचे आणि त्यांच्यासोबत विक्री करतही बसायचे. डी.ए.व्ही काॅलेजमध्ये शिकणारा आकाश आणि नववीत शिकणारा रोहित अभ्यास सांभाळून ही सर्व धावपळ करायचे.



याच दिनक्रमानुसार हे दोन्ही भाऊ शुक्रवारी सकाळी फुले आणण्यासाठी दादरला निघाले. एल्फिस्टन स्टेशनवर उतरून मागे फुल मार्केटमध्ये चालत जायचे असा त्यांचा ठरलेला मार्ग. त्यानुसार एल्फिन्स्टन स्टेशनवर उतरून पुलावरून चालू लागताच चेंगराचेंगरी सुरू झाली. दोन्ही भावांनी एकमेकांचे हात घट्ट धरले हाते. पण गर्दीचा रेटाच एवढा होता की या लहानग्यांचे हात सुटले आणि दोघेहीजण या चेंगराचेंगरीत सापडले. त्यात रोहितचा मृत्यू झाला. तर जखमी आकाशला केईएममध्ये उपचार सुरू असताना शुद्ध आली.



शुद्धीवर येताच रोहित कुठे आहे? हा एकच प्रश्न तो विचारू लागला. फुलासारखा एक मुलगा गमावला तर दुसरा भावाच्या आठवणीने कोमेजला आपले दु:ख सांगायचे कुणाला? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांपुढे निर्माण झाला. रोहित हा उत्कर्ष गोविंदा पथकाचा सलामीचा गोविंदा होता. त्यामुळे त्याच्या जाण्याने रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे.


परब कुटुंबीय मागील अनेक वर्षांपासून परिसरात भाड्याच्या घरात राहतात. आकाश आणि रोहित हे दोघेही भाऊ आई शुभांगी आणि वडील अंकुश यांना मदत म्हणून येथील साईबाबा मंदिराजवळ बसून हार विक्री करायचे. दसऱ्यासाठी संपूर्ण कुटुंबाचीच हार फुलांसाठी धावपळ सुरू होती. दसऱ्यानिमित्त साई मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी असते म्हणून आकाश आणि रोहित दादरला फुले आण्यासाठी गेले होते. परंतु ही दुर्दैवी घटना घडल्याने विभागात उत्सवाचे नाहीतर तर दुःखाचे मळभ दाटले आहेत.
- विजय शिंदे, स्थानिक रहिवासी



हेही वाचा -

आता साडेनऊ कोटी खर्चून एल्फिन्स्टनवर बांधणार पूल



डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा