Advertisement

'तेरा नसीब अच्छा था...इसलिए बच गया'


'तेरा नसीब अच्छा था...इसलिए बच गया'
SHARES

केईएम रुग्णालयात संध्याकाळी 4 च्या सुमारास हा संवाद सुरू होता...बाजूला बसलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर अजूनही अविश्वासाचे भाव होते...आणि समोर खाकीत बसलेला पंचनामा करणारा माणूस त्याला म्हणत होता...'तेरा नसीब अच्छा था...इसलिए बच गया...'

या संवादात बसलेली व्यक्ती म्हणजे जमालउद्दीन वाडसा! शुक्रवारी सकाळी लाखो मुंबईकरांप्रमाणेच 28 वर्षीय जमालउद्दीन वाडसा ही सकाळी परळ स्टेशनला पोहोचले. वेळ सकाळची असल्यामुळे साहजिकच परळ स्टेशनला गर्दी होती. पण सर्वात जास्त गर्दी होती परळच्या ब्रीजवर..तोच कोणीतरी गर्दीतून स्टेशनवर शॉर्टसर्किट झालं, पूल पडतोय, पत्रे पडतायत अशी आवई उठवली. अफवेमुळे गर्दीतले लोक बिथरले. मिळेल त्या जागेवरुन जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या लोकांमध्ये एलफन्स्टन स्टेशनवर मोठी चेंगराचेंगरी झाली.

त्या चेंगराचेंगरीचं रुप एवढं भीषण होतं की त्यात 22 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आणि 39 जण जखमी झाले. त्यापैकीच एक जमालउद्दीन वाडसा. जमालउद्दीन हे परळमध्ये गारमेंटचं काम करतात. दररोज मानखुर्द ते परळ असा त्यांचा प्रवास. जमलेल्या लोकांनी त्यांना कसं वाचवलं याचा अनुभव त्यांनी 'मुंबई लाइव्ह'सोबत शेअर केला.

मी सकाळी 10.30 वाजता परळला पोहोचलो. खाली उतरणारे आणि चढणाऱ्यांमुळे बराच गोंधळ झाला. त्यात अनेक जण अडकले. मीही अडकलो. काहीच सुचत नव्हतं. सगळीकडे फक्त गोंधळ आणि आरडाओरडा होता. तेवढ्यात बाजूचा पत्रा कुणीतरी बाहेरून ओढला. बाहेरच्या लोकांनी पत्रा तोडून मला ओढून बाहेर काढलं. माझ्यासोबत माझा मित्र देखील होता. त्यालाही किरकोळ मार लागला.

जमालउद्दीन वाडसा, जखमी

जमालउद्दीन यांच्या डाव्या हाताला मार लागलाय आणि त्याच खांद्याला जबर मुका मारही बसलाय. पण त्यांच्या शुक्रवारच्या अनुभवाला 'जिवावरचं हातावर निभावलं' असंच म्हणावं लागेल.हेही वाचा

...तर एलफिन्स्टनवरची चेंगराचेंगरी टळली असती!


Read this story in English
संबंधित विषय