शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

राजा राममोहन रॉय यांच्यावर गंभीर आरोप केल्याप्रकरणी चर्चेत असलेली अभिनेत्री पायल रोहतगी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पायल रोहतगीनं राजा राममोहन रॉय यांच्यानंतर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय कुळाचे नसून, त्यांचा जन्म शूद्र जातीत झाला’ असं वादग्रस्त ट्वीट तिनं केलं आहे.

जन्म शूद्र जातीत

ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत पायल रहतोगीनं वादग्रस्त विधान केलं. 'शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म शूद्र जातीत झाला होता’, असं तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ट्विटरसोबतच तिनं इन्स्टाग्रामवर देखील अशीच पोस्ट शेअर केली आहे.

मराठ्यांना आरक्षण का ?

इन्स्टाग्रामवर पती संग्राम सिंगसोबतचा फोटो शेअर करत पायलनं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याशिवाय महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिलं ? असा सवालही तिनं केला आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळं सर्व स्तरावरून तिच्यावर टीका होतं आहे.

तीव्र स्वरुपाचं आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांचा पायल रोहतगीनं अपमान केला असून, हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे. तसंच, तिच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पायल रोहतगी हिच्यावर कारवाई करणार नसतील तर याविरोधात राज्यभर तीव्र स्वरुपाचं आंदोलन राष्ट्रवादी उभारेल असा इशारा देखील नवाब मलिक यांनी दिला आहे. त्यामुळं पायल रोहतगीवर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा -

दक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये रजनीकांतच शिखरावर

सोनसाखळी चोरांनी चोरीचा पॅटन बदलला, दुचाकीची जागा घेतली रिक्षाने


पुढील बातमी
इतर बातम्या