Exclusive: रस्त्यावरच्या प्रत्येक मनोरूग्णाला पुरस्कार समर्पित- डाॅ. भरत वाटवाणी

रंजल्या जीवाची, गांजल्या जीवाची मनी धरी खंत, तोची खरा, साधू तोची खरा संत... हे वचन तंतोतंत लागू होतं ते बोरीवलीतील डाॅक्टर आणि रॅमन मॅगसेस पुरस्कार विजेते डाॅ. भरत वाटवाणी यांना. रस्त्यावर एखादा भिकारी वा मनोरूग्ण दिसल्यास सर्वसामान्य व्यक्ती त्याच्यासमोर पैसे टाकून पुढं जातो किंवा कानाडोळा करून पुढं सरकतो. पण डाॅ. वाटवाणी यांचं तसं नाही. रस्त्यावर खितपत पडलेल्या मनोरूग्णाला ते मदतीचा हात देतात अन् जगण्याला आधार... त्याच्या प्रयत्नामुळेच एक-दोन नव्हे तर ७ हजारांहून अधिक भटके मनोरूग्ण आजघडीला 'माणूस' म्हणून जगताहेत.

कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

रस्त्यावरच्या भटक्या मनोरूग्णाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे डाॅ. वाटवाणी यांच्या या अतुलनीय कामाची दखल अखेर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. आशिया खंडातील नोबेल म्हणून ओळखल्या जाणारा मानाचा रॅमन मॅगसेस पुरस्कार नुकताच डाॅ. वाटवाणी यांनी जाहीर झाला आहे. शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणारे सोनम वांगचूक अर्थात थ्री इडियट चित्रपटाचा 'खरा' हिरो यांच्यासह डाॅ. वाटवाणी यांना आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी मॅगसेस पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

गुरू पौर्णिमेचा योग

गुरू पौर्णिमेच्या दिनी हा पुरस्कार जाहीर झाल्याने डाॅ. वाटवाणी यांनी आपले गुरू डाॅ. बाबा आमटे यांना आणि रस्त्यावरील प्रत्येक मनोरूग्ण माझ्यासाठी गुरू आहे, त्यांनीच माझ्याकडून हे काम करून घेतलं त्यामुळं हा पुरस्कार रस्त्यावर भटकणाऱ्या प्रत्येक मनोरूग्णाला समर्पित केल्याची प्रतिक्रिया खास 'मुंबई लाइव्ह'ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

बघता बघता ध्येय ठरलं...

रस्त्यावरचा मनोरूग्ण स्वत: मनानं रस्त्यावर भीक मागण्यासाठी येत नाही, तर त्याला परिस्थिती रस्त्यावर आणते, त्याचं कुटुंब त्याला रस्त्यावर आणतं. त्यावेळेस त्याला खरी गरज असते ती आधाराची आणि उपचाराची. हीच भावना मनात ठेवत डाॅ. वाटवाणी आणि त्यांच्या पत्नीनं पुढं येत रस्त्यावरच्या मनोरूग्णांना आधार देत त्यांना पुन्हा माणसांत आणण्याचा प्रयत्न सुरू केला. बघता-बघता त्यांच्यासाठी हे एक ध्येयच होऊन बसलं. रस्त्यावर अशा प्रकारे मनोरूग्ण येऊच नये हेच त्यांच ध्येय. हेच ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले नि हळहळू या कामाची व्याप्ती इतकी वाढली की ते एक मोठं समाजकार्यच होऊन बसलं.

सेवाभावी संस्थेची स्थापना

रस्त्यावर एखादा मनोरूग्ण दिसला की त्याला आपल्या बोरीवलीतील खासगी क्लिनिकमध्ये आणायचं. त्याच्या खाण्या-पिण्याची सोय करत त्याला योग्य ते उपचार द्यायचे. त्याच्या कुटुंबीयांना शोधायचं आणि त्यांची मानसिकता बदलायची असं हे या पती-पत्नीचं काम. पुढं हे काम वाढत गेलं नि त्यातून कर्जत इथं 'श्रद्धा' या सेवाभावी संस्थेची दोघांनी स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून भटक्या मनोरूग्णांसाठी भरीव काम केलं जात आहे. याच कामाची दखल घेत डाॅ. वाटवाणी यांनी रॅमन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे.

डाॅ. बाबा आमटे प्रेरणास्थान

कुष्ठरोग्यांना आपलंस करत त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे डाॅ. बाबा आमटे आपले प्रेरणास्थान आणि गुरू असल्याचं डाॅ. वाटवाणी अभिमानानं सांगतात. डाॅ. आमटे यांच्या कामातूनच आपल्याला प्रेरणा मिळाली आणि आपण रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरूग्णांसाठी काम करू लागलो असंही ते आवर्जून सांगतात. तर महत्त्वाची बाब म्हणजे बाबा आमटे डाॅ. वाटवाणी यांना आपला मानसपूत्र मानत होते.

पहिला फोन प्रकाश आमटेंना

मानाचा मॅगसेस पुरस्कार जाहीर झाल्याचं कळल्यानंतर खूप आनंद झाला, जबाबदारी वाढल्याची जाणीवही झाली. या आनंदात पहिला फोन केला तो डाॅ. प्रकाश आमटे यांना. पुरस्कार जाहीर झाल्याचं एेकून प्रकाश आमटे जोरात हसले आणि म्हणाले ''भरत यू डिझर्व्ह इट''. गुरूचे हे चार शब्द मला मॅगसेस पुरस्कार मिळण्याच्या आनंदाहूनही अधिक आनंद देऊन गेल्याचंही डाॅ. वाटवाणी यांनी सांगितलं.

कुटुंबाची मानसिकता बदलायचीय

मॅगसेस पुरस्कार जाहीर झाल्यानं आता आपली जबाबदारी वाढल्याचं सांगत डाॅ. वाटवाणी यांनी भविष्यात हे कार्य आणखी व्यापक स्वरूपात पुढं न्यायचं ध्येय ठेवलं आहे. रस्त्यावरच्या मनोरूग्णाकडं बघण्याची लोकांची मानसिकता तर बदलायची आहेच, पण मनोरूग्ण म्हणजे अडगळ असं समजतं त्याला रस्त्यावर आणणाऱ्या कुटुंबाचीही मानसिकता बदलायची आहे. जेणेकरून यापुढं एकही मनोरूग्ण रस्त्यावर येणारच नाही, असंही डाॅ. वाटवाणी सांगतात. तर कर्जतमध्ये मनोरूग्णांसाठी आणखी मोठं पूनर्वसन केंद्र उभारण्याचं त्यांचं स्वप्न आहे.

त्यांच्या या स्वप्नासाठी 'मुंबई लाइव्ह'कडून शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला सलाम.


हेही वाचा-

प्लॅस्टिक पिशवी घेऊन या, रोपटं घेऊन जा

५० मिनिटात ५० नादनिर्मिती करणारी 'ताल राणी'


पुढील बातमी
इतर बातम्या