Advertisement

५० मिनिटात ५० नादनिर्मिती करणारी 'ताल राणी'


५० मिनिटात ५० नादनिर्मिती करणारी 'ताल राणी'
SHARES

एकावेळी अनेक वाद्याची झलक दाखवणं तसं कठीणच. पण योगिता तांबे या तरूणीनं ही किमया करून दाखवली आहे. चक्क ५० मिनिटात ५० नादनिर्मिती करून तिनं नवा विक्रमच केला आहे. योगिताच्या या विक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'नं देखील घेतली आहे. तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल की, योगिता जन्मापासून दृष्टीहीन आहे. पण नियतीपुढं न झुकता जगायची सकारात्मक दृष्टी जपत योगितानं आपल्या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात केली


५० वाद्यांच्या तालावर...

गणेशोत्सव, नवरात्र उत्सवादरम्यान आपण पारंपरिक वाद्यांना अधिक पसंती देतो. मात्र, या मंगल दिवशीच आपल्याला या वाद्यांची आठवण होते. डीजेच्या तालावर थिरकणारी तरूणाईला वाद्य संस्कृतीचा विसर पडला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत चालल्यामुळे आपली लोककला आणि वाद्यं एक दिवस इतिहास जमा होतील, अशी चिंता योगिताला सतावत आहे. मग ही लोककला जपण्यासाठी योगितानंच पुढाकार घेतला

ही वाद्य जास्तीत लोकांपर्यंत पोहोचावीत यासाठी योगितानं एक वेगळाच प्रयोग सादर केला. ५० मिनिटांमध्ये ५० वेगवेगळ्या वाद्यांतून नादनिर्मिती करून योगितानं एक नवा विक्रम केला आहे. तिच्या या कामगिरीची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं देखील घेतली आहे.


ताट-वाट्यांपासून नादनिर्मिती

तबला, ढोलकी, नगारा, दिमडी, हलगी, ढोलक, नाशिक ढोल, ताशा, डमरू, संबळ, टाळ, मंजिरी, खंजिरी, झांज, चिपळ्या, बगलबच्च, लेझीम, पखवाज, पिपाणी, हार्मोनियम, डफ, तुणतुणा, तुतारी ही नेहमीची वाद्य वाजवून तिनं नादनिर्मिती केली

फक्त एवढंच नाही तर ताम्हण, कलश, नारळ, ताट-चमचा, घंटा, छोटी घंटा, शंख, खुळखुळा, सूप, चाबूक, घुंगरू, खलबत्ता, करवंटी, हंडा याचा देखील योगितानं वापर केला आहे


योगिताचा संघर्षमय प्रवास

योगिता मुळची लांजाची. पण तिचं बालपण मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये गेलं. योगिताला जन्मापासून दृष्टीदोष आहे. सुरुवातीला तिला थोडेफार दिसायचं. त्यामुळे तिला सर्वसामान्य मुलांच्या शाळेत घातलं. पण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे योगिताला दादरच्या कमला मेहता अंध शाळेत घातलं. तिथं योगिताचं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं. योगिताला दहावीला ७०.९२ टक्के मार्क मिळाले

पुढे योगितानं अकरावीला रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. रुईया कॉलेजमधून इतिहास विषय घेऊन तिनं बी.ए आणि एम.एचं शिक्षण पूर्ण केलं.


संगीतशिक्षक म्हणून कार्यरत

योगिता जोगेश्वरीतील अस्मिता विद्यालयात २०१२ पासून संगीत शिक्षक म्हणून काम करते. तिनं शाळेत बालवाद्यवृंद बसवला आहे. याशिवाय बालनाट्यांना ती बॅकग्राऊंड म्युझिक देते. जुहू इथल्या स्पेशल मुलांसाठी ती संगीताचे क्लासेस घेते. योगिताला संगीत आणि गाणी ऐकण्याचा छंद आहे. तिला ३००० गाणी तोंडपाठ आहेत. ती एकंदर पंचवीस तालवाद्य वाजवते. तिची स्मरणशक्ती दांडगी आहे. जवळपास १५०० जणांचे मोबाईल नंबर पाठ आहेत

भविष्यात निसर्गसंगीताला साद देणारे कलाकार घडवायचे आहेत, हे योगिताचं स्वप्न आहे. रिमिक्स, डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरूणाईला खऱ्या संगीताची ओळखं करून देणं हेच तिचं ध्येय आहे. एक दिवस मी माझं ये ध्येय नक्कीच गाठीन असा विश्वास तिनं व्यक्त केला.


मला लहानपणापासून टेबल, ताट, वाट्या यापासून नादनिर्मिती करण्याची आवड होती. माझी ही आवड आजी-आजोबांनी हेरली आणि मला तबल्याच्या क्लासमध्ये टाकलं. कमला मेहता या अंध शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण करता करता मी वाद्य वाजनाची आणि संगीताची कला देखील जोपासली

- योगिता तांबेतबला वादक



हेही वाचा

गंभीर आजारालाही तिनं हसून दिलं उत्तर!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा