Advertisement

गंभीर आजारालाही तिनं हसून दिलं उत्तर!

जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काय काय करू शकतो, याचं उत्तम उदाहरण आदितीनं समोर ठेवलं आहे. जन्मत:च 'डाऊन सिंड्रोम' या आजारानं ग्रस्त असलेल्या आदिती वर्मानं नवी मुंबईत स्वत:चा एक कॅफे सुरु केला आहे. नवी मुंबईच्या बेलापूर उपनगरात भूमी मॉलमध्ये 'आदितीज कॉर्नर' नावाचा तिचा कॅफे आहे.

गंभीर आजारालाही तिनं हसून दिलं उत्तर!
SHARES

तुमच्या बाळाला जन्मजात एक आजार आहे, हे ऐकणं कुणाच्याही पालकांसाठी कठीण आहे. तसंच काहीसं नवी मुंबईतल्या 'आदिती वर्मा'च्या आई-वडिलांच्या बाबतीत झालं. लहानपणी आदितीच्या आई-वडिलांना तिच्या आजाराविषयी डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आता आपल्या बाळाचं काय होणार? आपल्यानंतर तिचा कोण सांभाळ करणार? ती स्वत:च्या पायावर कधी उभी राहू शकेल की नाही? असे प्रश्न त्यांच्या मनात फिरू लागले. पण त्यांच्या या विचारांना फाटा देत आदितीनं जे करून दाखवलं, त्यासाठी तिचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच!



जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काय काय करू शकतो, याचं उत्तम उदाहरण आदितीनं समोर ठेवलं आहे. जन्मत:च |ऑटिझम या आजारानं ग्रस्त असलेल्या आदिती वर्मानं नवी मुंबईत स्वत:चा एक कॅफे सुरु केला आहे. नवी मुंबईच्या बेलापूर उपनगरात भूमी मॉलमध्ये 'आदितीज कॉर्नर' नावाचा तिचा कॅफे आहे. आदितीमुळे तसा हा कॅफे या परिसरात बराच लोकप्रिय आहे. त्यामुळे या कॅफेत नेहमीच तरूण-तरुणींची वर्दळ असते.


आदितीच्या संघर्षाची कहाणी

आदिती डाऊन सिंड्रोमनं त्रस्त तर होतीच, शिवाय अडीच वर्षांची असतानाच तिच्या हृदयाला छिद्र असल्याचंही निदान झालं होतं. त्यावेळी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यात आदितीच्या वडिलांची वारंवार बदली होत असायची. त्यामुळे वर्मा कुटुंब नेहमीच फिरतीवर असे. दिल्ली, जयपूर, पुणे अशा जागी बदली झाल्यानंतर ते बेलापूरला राहायला आले. २००१ पर्यंत जयपूरमध्ये आदितीने स्पेशल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. मग पुढची चार वर्ष पुण्यात काढली. शेवटी नवी मुंबईत बेलापूरला आल्यावर स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठानमध्ये आदिती शिकू लागली. पण आदितीची तब्येत पाहता ही बदलीची नोकरी त्यांना शक्य नव्हती. त्यामुळे त्यांनी बदलीच्या नोकरीला कंटाळून राजीनामा दिला आणि स्वत:चा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला.



हेही वाचा : कधी पाहिली आहे का अशी रॅली?



कॅफेची सुरुवात कशी झाली?

आदितीनं देखील तिची आई रीना वर्मा आणि बाबा अमित वर्मा यांच्याबरोबर ऑफिसमध्ये काम करायला सुरुवात केली. पण दिवसभरात ती तिथे कंटाळून जायची. बेलापूरच्या एका मॉलमध्ये असणाऱ्या त्यांच्या ऑफिसमध्ये एक मुलगा चहा द्यायला यायचा. तो सगळ्या दुकानांमध्ये, ऑफिसमध्ये चहा द्यायचा. यावरून आदितीला कॅफेची कल्पना सुचली. त्यानुसार तिच्या कुटुंबियांनी तिला गिफ्ट म्हणून हा कॅफे दिला. गेली दोन वर्ष आदितीच हा कॅफे चालवते.



आदितीला स्वत:च्या पायावर उभं असल्याचं पाहून आम्ही खूप समाधानी आहोत. आम्ही आदितीला जास्तीत जास्त स्वत:वर निर्भर राहायला शिकवलं आहे. ती स्वत:च स्वत:चा सांभाळ करण्यास सक्षम आहे.

आदितीसारख्या मुलांना प्रेमानं हाताळण्याची गरज आहे. जर आपण त्यांच्या पाठिशी उभं राहिलो तर त्यांचा आत्मविश्वास नकीच वाढेल. कॅफे सुरू केला तेव्हा आदितीच्या मनात थोडी भिती होती. पण आता तिचा आत्मविश्वास बघण्यासारखा आहे.

रीना वर्मा, आदितीची आई


घरीसुद्धा आदितीला स्वयंपाकाची आवड होतीच. आदितीच्या या आवडीला तिच्या आई-बाबांनी ओळखलं आणि तिला स्वत:च्या पायावर उभं करायचं ठरवलं. भूमी मॉलच्या वरच्या मजल्यावर जागा मिळाली. १ जानेवारी २०१६ ला आदितीचा कॅफे सुरू झाला. चहा, कॉफी, वेफर्स आणि मॅगीबरोबर तिनं घरचे पदार्थही सुरू केले. इथला मेनू देखील रोज बदलतो. त्यामुळे आसपासच्या लोकांना जेवण्यासाठी हक्काचं ठिकाण सापडलंय.



आदिती स्वत: गल्ल्यावर बसते. तिच्या मदतीला दोन जणं आहेत. ग्राहक आले की आदिती त्यांना स्वत: अटेंड करते. त्यांना काय हवं? काय नको? यावर तिचं पूर्ण लक्ष असतं.


मी सकाळी 10 ला कॅफे उघडते आणि संध्याकाळी 6 वाजता बंद करते. आई-बाबांचं ऑफिस पण माझ्या कॅफेजवळ आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबतच येते आणि जाते. मी पहिल्यापासूनच घरी काही ना काही पदार्थ बनवायचा प्रयत्न करायचे. त्यामुळे मला आता हा कॅफे चालवणं कठीण नाही जात. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, माझ्यासारख्या इतर मुलांच्या पालकांनी स्वत:च्या मुलांना समजून घ्यावं. त्यांना जे काही करायचं असेल ते करू द्यावं. माझ्या आई-बाबांनी माझा खूप आत्मविश्वास वाढवला. आज मी स्वत:च्या पायावर उभी आहे, यामागे तेच आहेत.

आदिती वर्मा, मालक, आदिती कॉर्नर


डाऊन सिंड्रोमसारख्या आजाराशी दोन हात करून आज आदिती स्वत:च्या पायावर उभी आहे. यामध्ये जेवढा आदितीचा मोलाचा वाटा आहे, तेवढाच तिच्या पालकांचा देखील आहे. त्यामुळे आदितीची गोष्ट तिच्यासारख्या मुलांसाठीच नाही, तर त्यांच्या पालकांसाठीही प्रेरणादायी आहे!



हेही वाचा

तृतीयपंथींचं 'तिसरं' जग..थर्ड आय कॅफे!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा