Advertisement

जेव्हा 'तो' एकदिवस 'ती'ची जागा घेतो...


जेव्हा 'तो' एकदिवस 'ती'ची जागा घेतो...
SHARES

पाचच्या अलार्मला दीपक (काल्पनिक नाव) गडबडीनं उठला. उठवत नव्हतं पण काल बायकोसोबत लावलेली पैज त्याला आठवली. एकच दिवस तिची जागा चालवायची होती. मग ठीक आहे की, त्यात काय ऐवढं? असं बोलून दीपक उठला.

मुलांची ७ ची शाळा असते...मुलांना तयार करायचं होतं. मुलांचा, स्वत:चा आणि बायकोचा डबा अशी कामं दीपकला डोळ्यांसमोर दिसत होती. पण पहिलं काय करू हेच त्याला सुचत नव्हतं. मुलांना उठवण्यात वेळ गेला. त्यांना आंघोळीला पाठवलं आणि जेवणाचं काय करू हेच दीपक ठरवत होता. बाकी जेवण काही येत नव्हतं. पण अंड्याची भुर्जी जमायची. त्यामुळे दीपकनं डब्यासाठी अंड्याच्या भुर्जीचाच बेत केला. भुर्जी आणि ब्रेड आजचा मेनू फायनल. पण दीपकला भुर्जी हा प्रकार जास्त आवडायचाच नाही. रोहिणीला ऑफिसला लवकर जायचं असायचं, तेव्हा ती भुर्जीच करायची आणि दीपक तिला ऐकवून दाखवायचा. पण आज आपणही तेच करत आहोत याची जाणीव दीपकला होती. पण काही पर्याय नव्हता. कांदा कापताना डोळ्यातून नुसत्या गंगा जमुना वाहत होत्या. असं काही करायची सवय नसल्यानं थोडी अडचण होत होती. कशीबशी अंड्याची भुर्जी केली. मुलं तोपर्यंत तयार झाली. मुलांना नाष्ट्याला दूध आणि सफरचंद दिलं. ६.३५ ला गाडी येते. त्यामुळे दीपकनं घाईतच त्यांचा डबा बॅगेत भरला आणि मुलांना गाडीत बसवून आला.

दीपक सकाळी लवकर उठला होता. त्यात ही कामं..खूप थकला होता. त्यामुळे थोडा आराम करीन आणि मग पुढच्या तयारीला लागीन असा विचार करतच दीपक घरी आला. पण घरात येताच रोहिणीनं चहाचं फर्मान सोडलं. फरक एवढाच होता की रोज दीपक ऑर्डर सोडायचा, आज रोहिणी सोडत होती. रोहिणीनं सुद्धा संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं होतं. मग काय, दीपक चहाच्या तयारीला लागला. दोघांनी एकत्र चहा आणि नाष्टा केला. रोहिणीनं डबा काय आहे? हे विचारलं. त्यावर 'डब्याला अंड्याची भुर्जी आणि ब्रेड नको. चपाती आणि भाजी कर', असं दुसरं फर्मान रोहिणीनं सोडलं. मला चपाती-भाजी येते का? असा प्रश्न दीपकनं केला. त्यावर रोहिणी बोलली की, हा माझा प्रोब्लेम नाही. भुर्जी खाऊन मी कंटाळले आहे. पाहिजे तर मी तुला सांगते तसं कर.

सौजन्य

दीपककडे काही पर्याय नव्हता. पैज तर जिंकायची होती. सो तिनं पीठ कसं भिजवायचं हे दीपकला सांगितलं. ते त्यानं केलं. आता दीपक समोर मोठा प्रश्न होता तो चपात्या करायच्या कशा? रोहिणीनं ते सुद्धा दाखवलं. पण त्याला काही जमता जमेना. वेगवेगळ्या देशांच्या नकाशाप्रमाणे चपात्या लाटल्या आणि कशाबशा त्या शेकल्या. अजून भाजी करायची होती. दीपकनं घड्याळाकडे नजर फिरवली. ओ नो..८ वाजून गेले होते. ९ वाजता ऑफिसला निघायचंय. रोहिणी अंड्याची भुर्जी घेऊन जा प्लीज. आता काही भाजी बनवणं शक्य नाही. संध्याकाळी बनवतो, असं दीपक गयावया करू लागला. रोहिणी तयार झाली. दीपकनं भरलेला डबा घेऊन रोहिणी ऑफिसला निघून गेली. दीपकनं बाकी सर्व आवरलं आणि निघेपर्यंत त्याला उशीर झाला.

संध्याकाळी दोघांची ऑफिसवरून घरी येण्याची जवळपास एकच वेळ असायची. रोहिणी थोडी लवकर यायची. तिच्या अर्ध्या तासानंतर दीपक यायचा. आज रोहिणी ऑफिसमधून आली पण निवांत बसून राहिली. टीव्ही बघत होती. तेवढ्यात दीपक आला. अगं बसली काय आहेस? आज जेवण नाही बनवायचं का? मग दीपकच्याच लक्षात आलं, आज आपण रोहिणीची भूमिका बजावत आहोत. पण तो इतका थकला होता की त्याला उठावसं वाटत नव्हतं. तसा तो उठला..फ्रेश झाला. मुलांना आजीकडून आणायचं होतं. जेवायला त्यानं डाळ-भात आणि भाजी करायचं ठरवलं. डाळ-भात त्याला लावायला येत होता. त्यामुळे डाळ-भात कुकरला लावला. मुलांना आजीकडून आणलं. आता वरणाला फोडणी कशी द्यायची? रोहिणीला विचारत विचारतच वरण केलं. आता त्याला भाजीची तयारी करणं कठीण होतं. तो खूप थकला होता आणि प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे रोहिणीला 'आहे ते प्लीज जेवूया, आता खूप थकलो आहे' अशी विनंती केली. रोहिणी पण त्याची अवस्था पाहून ठीक आहे बोलली. ते जेवले. जेवल्यावर भांडी पण घासायची होती. त्यानं मुलांना झोपवलं आणि भांडी घासून घेतली. आता मात्र तो पुरता थकला होता.

सौजन्य

रोज रोहिणी एकटी किती कामं करते, याची जाणीव त्याला झाली होती. दीपक रोहिणीजवळ गेला. तिचा हात हातात घेतला आणि बोलला, रोहिणी तू रोज किती कामं करते याची जाणीव मला झाली आहे. मी एक पैज लावली होती तुझ्यासोबत. त्यासाठी एक दिवस मी तुझं काम केलं. पण तू निस्वार्थीपणे आजपर्यंत आमच्यासाठी केलंस. सकाळी ५ वाजता उठायचं.. मुलाचं करायचं. त्यानंतर आपले डबे. मग तुझं ऑफिसला घाईघाईत जाणं. ऑफिसवरून आलं की रात्रीच्या जेवणाची तयारी. किती धावपळ होत असेल तुझी?

रोहिणीला स्वत:वर विश्वास बसत नव्हता. आपण स्वप्न तर पाहत नाही ना? ती निमूटपणे ऐकत होती. एक दिवस मी तुझ्या जागी होतो. तू जे काही करतेस ते मी एक दिवस केलं आणि मी एवढा थकलो आहे. तू तर ते रोज करतेस. घरची काम करणं ही फक्त स्त्रियांचीच जबाबदारी असते हा माझा समज आज मोडलाय. घरचं काम करणं ही स्त्री-पुरुष दोघांची जबाबदारी आहे. तू सुद्धा माणूसच आहेस. कामं करून दमत असशील याचा विचार देखील मी कधीच केला नाही. तुझी धावपळ मी बघायचो. पण कधी लवकर उठून तुला जेवणात किंवा इतर कामात मदत केली नाही. संध्याकाळी तू थकून भागून ऑफिसमधून आल्यावर कधी जेवणात मदत केली नाही. ऑफिसला तर आपण दोघं जायचो. पण माझं काम ऑफिसमध्येच संपून जायचं. पण तू ऑफिस सांभाळत घरची जबाबदारी पण पार पाडतेस तेही माझ्या मदतीशिवाय. ऑफिस आणि घर यात तुझी तारेवरची कसरतच सुरू असते. तीच तारेवरची कसरत माझी काल झाली. आज ऑफिसची आणि घरची जबाबदारी पार पाडून मी जेवढा थकलोय तेवढीच तू सुद्धा थकत असशील. खरंतर माझ्याहून अधिक थकत असशील. आज मी ही पैज नक्की जिंकलो असेन पण जबाबदाऱ्यांच्या शर्यतीत मी हरलो गं. आज मी तुला प्रॉमिस करतो की, उद्यापासून सर्व कामं आपण वाटून घ्यायची. घरची कामं फक्त तुझी नाही, तर माझी देखील जबाबदारी आहे. एवढंच नाही, तर आपण लहानपणापासूनच आपल्या मुलांना या गोष्टी शिकवूया. दीपकच्या तोंडून ही वाक्य ऐकून रोहिणी खरंच चकित झाली होती. तिच्यासाठी तो क्षण कधीही न विसरता येणारा होता.

रोहिणीसारख्या कितीतरी स्त्रिया आज सेम परिस्थितीचा सामना करत आहेत. ऑफिस आणि घरातल्या कर्तव्यांची जबाबदारी सांभाळता सांभाळता अक्षरश: नाकी नऊ येतात. ऑफिस सांभाळायचं त्यानंतर प्रवास करून घरी यायचं आणि घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या. हे वाटतं तितकं मुळीच सोपं नाही.

सौजन्य

माझ्या ओळखीत अशी किती तरी उदाहरणं आहेत. काही जणांच्या घरात आज स्त्री-पुरुष दोघं काम करतात. तर काही घरांमध्ये फक्त स्त्री एकटी राबत असते. माझ्या कितीतरी मित्रांचा हाच समज आहे की, घरची कामं ही स्त्रियांनी केली पाहिजेत, तर काहींना वाटतं की, घरची कामं ही स्त्री-पुरुष दोघांनी एकत्र केली पाहिजेत.

मुळात ही फक्त स्त्रियांचीच कामं आहेत ही विचारसरणी बदलणं खरंच आवश्यक आहे. याची सुरुवात पहिली स्वत:च्या घरातूनच करा. हे तुझं काम नाही. हे काम मुलींचं आहे, असं लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. मुलींना जेवण आलंच पाहिजे, लहान वयातच हे धडे दिले जातात. पण हेच मुलांना शिकवलं जातं का? 'आई, बहीण असताना मी कशाला जेवण आणि घरची कामं करू?' किंवा 'अगं आई मला जेवण करायला देतच नाही. ही मुलींची कामं आहेत,' अशी उत्तरं किती तरी मुलांनी दिली. किती तरी पुरुषांनी हेही सांगायला कमी केलं नाही की, 'हल्लीच्या स्त्रिया कुठे करतात घरची कामं?' पण कालांतरानं त्या स्त्रfया देखील घरचं जेवण करायला शिकतातच. मुळात अशी उदाहरणं क्वचितच आढळतील. पण बहुतांश घरांमध्ये दिसणारं चित्र म्हणजे स्त्रियांची ऑफिस आणि घर यातील तारेवरची कसरत.



ती आई असो बहीण असो किंवा बायको असो..ती सकाळी उठणार, नाष्टा देणार (काही घरांमध्ये तर नवऱ्याला चहा हातात द्यावा लागतो!) त्यानंतर ऑफिसला जायची तयारी. ऑफिसमधून थकून येणार..त्यानंतर जेवण करणार. सर्वांना जेवायला देणार (काही घरांमध्ये साधे जेवण सुद्धा स्वत:हून घेतले जात नाही. बायको वाढणार त्यानंतर महाशय जेवणार!) त्यानंतर ती पडलेली भांडी घासणार आणि मग झोपणार. एवढं करून पुन्हा सकाळी लवकर उठायचंच. या कामांमध्ये नवऱ्याचा हातभार नसतोच!


सौजन्य

आठवड्याचे 3 दिवस घरच्या जेवणाची जबाबदारी पुरुषांनी घेतली तर काय बिघडेल? किंवा दोघांनी मिळून वाटून कामं करायला काय प्रॉब्लेम आहे? जेवण नाही तर 'मी भाजी कापून देतो' किंवा 'जेवणानंतरची भांडी मी घासतो', एवढं तरी करता येईलच. जेवण करता येत नसेल, तर शिकायला कसली लाज? माझे किती तरी मित्र आहेत, जे चांगलं जेवण बनवतात आणि काही जेवण बनवायचा प्रयत्न करतात. मग सर्वच मुलांनी हा प्रयत्न करायला काय हरकत आहे? दीपकसारखी पैज जर प्रत्येक पुरूषाने लावली, तरी या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी तयार मिळतील!



हेही वाचा

सेक्स वर्कर्सच्या मुलींची 'लालबत्ती एक्स्प्रेस'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा