लॉकडाऊन इफेक्ट, मुंबईकर देशात सर्वाधिक तणावग्रस्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. हळूहळू देश अनलाॅक होत आहे. मात्र, लाॅकडाऊनचा मोठा आर्थिक फटका सर्वांनाच बसला आहे. तर अनेकांचं मानसिक स्वास्थ्यही या काळात बिघडल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील नागरिक देशात सर्वाधिक तणावग्रस्त असल्याचं या सर्वेक्षणात दिसून आलं आहे.

युअर दोस्त या ऑनलाइन मेंटल हेल्थ प्लॅटफॉर्मकडून हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे.  सर्वेक्षणानुसार, मुंबईत ४८ टक्के तणाव वाढला आहे. त्यापाठोपाठ बंगळुरू, दिल्ली आणि चेन्नई या शहरातील प्रमाण अनुक्रमे ३७, ३५ आणि २३ टक्के वाढलं आहे. भारतातील कोविड आणि लॉकडाऊनमधील मानसिक आरोग्य’ या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. 

या सर्वेक्षणासाठी देशातील ८३९६ जणांचा एप्रिल ते जून दरम्यान अभ्यास करण्यात आला.  लॉकडाऊनने देशातील मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम केला असून ६५ टक्के लोकांना मध्यम ते तीव्र स्वरुपाचा तणाव आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच ३३ टक्के लोक प्रचंड तणावात होते. हा आकडा जून अखेरपर्यंत ५५.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला.

हे लॉकडाऊन किती दिवस चालणार हा सर्वात मोठा चिंतेचा मुद्दा होता. दीर्घकाळ चाललेल्या या लॉकडाऊनमुळे काम आणि आयुष्य यात संतुलन साधण्यातही अडचण आली. पाचपैकी दोन भारतीय कर्मचारी वेतन कपातीचा सामना करत आहेत.

सर्वेक्षणात सहभागी असलेल्या व्यक्तींपैकी ४१ टक्के जणांची चिंता वाढली आहे. तर लॉकडाऊनमुळे ३८ टक्के लोकांचा राग आणि चिडचिड वाढली आहे. काम आणि खाजगी आयुष्य यात संतुलन साधण्यात यश येत नसल्यामुळे ५९ टक्के भारतीय प्रभावित झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

तणावग्रस्तांमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण अधिक म्हणजे ३९ टक्के आहे. तर तणावग्रस्त नोकरदारांतं प्रमाण ३५ टक्के आहे. लॉकडाऊनमध्ये जशी वाढ होत गेली तसं विद्यार्थ्यांना भावनिकदृष्ट्या जास्त त्रास झाला. राग, चिंता आणि चिडचिड यामध्ये जास्त वाढ झाली. लॉकडाऊनमुळे इमोशनल होण्याचं प्रमाण २२ टक्क्यांनी वाढलं, तर झोप ११ टक्क्यांनी कमी झाली. अनेकांनी या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मित्र आणि कुटुंबाशी फोनवर बोलणे, बातम्या वाचणं कमी करणे असे विविध मार्ग अवलंबले.


हेही वाचा -

दादर, माहीम, धारावीत मलेरियाविरोधात महापालिकेची विशेष मोहीम

मुंबईत पावसाला सुरुवात, पुढच्या २४ तासासाठी हवामान खात्याचा इशारा


पुढील बातमी
इतर बातम्या