सोच सयानी ग्रुपचे अनोखे 'व्हर्टिकल गार्डन'

  • मानसी बेंडके
  • समाज

मुंबईत इमारतींची इतकी गर्दी होऊ लागली आहे की हिरवळ सापडेनाशी होऊ लागली आहे. अति शहरीकरणाबरोबर येणारा बकालपणाही मुंबईचं सौंदर्य ओरबाडू लागला आहे. मात्र कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज इथला व्हर्टिकल गार्डनचा एक प्रयोग या वास्तवाला छेद देत आहे.

पर्याय व्हर्टिकल गार्डनचा 

मुंबईत इंच न इंच जागेला लाखो रुपये किंवा त्याहून अधिक रूपये मोजले लागतात. त्यामुळे मुंबईत कुठेही ऐसपैस जागा फारशी दृष्टीस पडत नाही. मग बाग-बगिच्यांना जागा मिळणं तर दूरचीच गोष्ट. पण आता व्हर्टिकल गार्डन हा एक चांगला पर्याय आहे. कमी जागेत आपल्याला हवी तशी बाग फुलवता येते. ठाकूर व्हिलेजमधल्या 'सोच सयानी' या ग्रुपनं देखील व्हर्टिकल गार्डन एका अनोख्या पद्धतीनं मांडलं आहे.

अनोखी संकल्पना

उभ्या भिंतीसारखी असणारी बाग म्हणजे व्हर्टिकल गार्डन. व्हर्टिकल गार्डनला ग्रीन वॉल, लिव्हिंग वॉल, इको वॉल, बायो वॉल, बायो बोर्ड असंही म्हणतात. या गार्डनमध्ये एखाद्या भिंतीला किंवा भिंतीसारख्या स्ट्रक्चरवर बाग विकसित करण्यात येते. त्यासाठी कुंड्या किंवा बॅगसारख्या विविध वस्तूंचा वापर करण्यात येतो. सोच सयानी या ग्रुपनं मात्र रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या खांबांवरच व्हर्टिकल गार्डन उभारलं आहे. या खांबांचा आधार घेत व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आलंय.

'नागरिकांच्या पाठिंब्याची गरज'

काँक्रिटीकरण इतकं झालं आहे की आम्हाला झाडं लावायला जागाच मिळत नव्हती. त्यामुळे आम्ही ही वेगळी संकल्पना घेऊन आलो आहोत. गटाराच्या बाजूला असणाऱ्या खांबांवर आम्ही हे व्हर्टिकल गार्डन उभं केलं आहे. या मोहिमेत परिसरातील सोसायटी आणि नागरिक सहभागी झाले. झाडं तर आम्ही लावली पण त्याची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी आम्हाला आणखी नागरिकांची मदत अपेक्षित असल्याचं सोच सयानीच्या स्वयंसेवकांनी म्हटलं आहे. 

टाकाऊ वस्तूंचा वापर

व्हर्टिकल गार्डनमध्ये बकेट्स, बॉटल्ससारख्या टाकाऊ वस्तू उपयोगात आणता येतात. सोच सयानीनं देखील टाकाऊ ऑईल कॅन्स, वॉटर बॉटल आणि रंगांचे डब्बे यांचा वापर कुंड्यांसारखा केला आहे. व्हर्टिकल गार्डन उठावदार दिसावे म्हणून कुंड्यांना वेगवेगळे आकार दिले आहेत. तर काही कुंड्या वेगवेगळ्या रंगानी रंगवल्या आहेत. काहींवर पर्यावरण संदर्भातील मेसेज लिहले आहेत.

सेल्फी विथ ट्री

ठाकूर व्हिलेज परिसरातील हे व्हर्टिकल गार्डन सध्या सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय. अनेक जण इथं भेट देतात. झाडांसोबत सेल्फी काढतात. एकप्रकारे सोच सयानी यांच्या संकल्पनेचं चांगलंच कौतुक होत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सोच सयानी नेहमीच काही ना काही हटके करण्याच्या प्रयत्नात असते. यावेळी देखील त्यांच्या संकल्पनेनं लोकांची मनं पुन्हा एकदा जिंकलीत. एवढीच अपेक्षा की नागरिकांनी त्यांना साथ द्यावी आणि ही संकल्पना जगभर पोहचवावी.


खड्डे मुक्तीचा वसा उचलणारे 'पॉटहोल्स वॉरीयर'

पाणी वाचवणारा ८० वर्षांचा 'वाॅटर वाॅरियर'

पुढील बातमी
इतर बातम्या