world photography day : जगाचं लक्ष वेधून घेणारे ६ फोटो

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

१९ ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्तानं जगाचं लक्ष वेधून घेणारे काही फोटो आम्ही घेऊन आलो आहोत.

१) दिल्लीत सामुहिक अंत्यसंस्कार

कोरोना व्हायरसमुळे मृत झालेल्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. अनेक ठिकाणी कोरोनानं मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा देखील कमी पडू लागली होती. आरोग्यसेवा प्रणाली तसंच स्मशानभूमी सेवेवर देखील प्रचंड ताण होता.

अनेकांना दफन किंवा अंत्यसंस्कार करणं कठीण झालं होतं. नवी दिल्लीतील स्मशानभूमीवर कोविड -19 पीडितांच्या सामुहिक अंत्यसंस्काराचं हवाई दृश्य टिपलं गेलं. हे किती भयानक आणि दु:खदायक आहे हे फोटो पाहून समजू शकतं.

२) सोनेरी वाघ

आसाममधल्या काझीरंगाच्या जंगलात मयुरेश हेंद्रेनं २०१९ ऑक्टोबरमध्ये हा फोटो टिपला होता. आपण एका दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार आहोत, याची त्याला नंतर जाणीवही झाली. या वाघाला गोल्डन टायगर किंवा टॅबी टायगर म्हटलं जातं हेही त्याला आधी माहीत नव्हतं.

गोल्डन टायगर किंवा सोनेरी वाघ म्हणजे काहीशी पिवळसर सोनेरी रंगाची त्वचा असणारा वाघ. इतर वाघांसारखे या वाघांच्या अंगावर काळे पट्टे स्पष्टपणे दिसत नाहीत.

२) अजमल कसाबचा फोटो

२००८ मध्ये २६/११ च्या हल्ल्यादरम्यान मुंबईच्या CSMT स्टेशनवर फोटोग्राफर सॅबॅस्टियन डिसुझा यांनी हा फोटो काढला होता.

कसाबचा तो फोटो पुढे कोर्टात त्याच्याविरुद्धच्या खटल्यात महत्त्वाचा पुरावा ठरला. २००९ सालच्या वर्षाच्या वर्ल्ड प्रेस फोटोंच्या मानद यादीत याचा समावेश करण्यात आला.

३) गुजरात दंगल

हा फोटोसुद्धा फोटोग्राफर सबॅस्टियन डिसुझा यांनीच गुजरातमध्ये काढला होता.

२००२ साली जेव्हा गुजरातमध्ये हिंसाचार सुरू होता तेव्हा डिसुझा AFP वृत्तसंस्थेसाठी काम करत होते. त्यांनी त्यावेळी टिपलेला हा फोटो गुजरात दंगलींची ओळख बनला.

४) पेल ब्ल्यू डॉट

या फोटोला अंतराळातील सर्वोत्तम फोटोंपैकी एक मानलं जातं. यामध्ये दिसणारा पांढरा लहान ठिपका ही आपली पृथ्वी आहे. हा फोटो तीस वर्षांपूर्वी वोयेजर १ यानानं घेतला होता.

सहा अब्ज किलोमीटर अंतरावरून हा फोटो घेण्यात आलेला आहे. नासा अजूनही या फोटोच्या संदर्भात विविध प्रकारचं संशोधन करत आहे. नुकतीच या फोटोची सुधारित आवृत्ती लोकांसमोर ठेवण्यात आली होती.

५) अयलान कुर्दी

स्थलांतरितांच्या बोटीमधून प्रवास करत युरोपात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात समुद्रात बुडून मरण पावलेल्या अयलान कुर्दी या बालकाचा हा फोटो.

तुर्कस्तानच्या समुद्रकिनाऱ्यावर तीन वर्षीय अयलानचा मृतदेह पालथा पडलेला होता. स्थलांतरितांच्या बिकट परिस्थितीचं गांभीर्य या फोटोमधून लक्षात येईल. हा फोटोच पुढे स्थलांतरितांच्या दुःखाचं प्रतीक बनला आहे. भारतातील कलाकार सुदर्शन पटनायक यांनी अयलान कुर्दीच्या फोटोचं वाळू शिल्प तयार केलं होतं.


हेही वाचा

१६ वर्षांच्या मुलाची कमाल, कॅमेरात कैद केले चंद्राचे फोटो

असा हाताळा DSLR कॅमेरा

पुढील बातमी
इतर बातम्या