राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत नुबेरशाह शेखला रौप्यपदक

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

ठाण्याचा अांतरराष्ट्रीय मास्टर नुबेरशाह शेखने नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली अाहे. या स्पर्धेत विविध वयोगटात १८ देशांमधील तब्बल ६६१ बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. नुबेरशाहचा समावेश असलेल्या वयोगटात त्याच्यासह चार भारतीय अांतरराष्ट्रीय मास्टर असल्यामुळे विजेतेपदासाठी चांगली चुरस रंगली होती.

असा रंगला थरार

स्विस लीग पद्धतीनं खेळविण्यात अालेल्या सात फेऱ्यांच्या या स्पर्धेतील सहाव्या फेरीअखेर दोघे जण ५ गुणांसह आघाडीवर होते. नुबेरशाहसह अन्य चार जण चार गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी होते. अखेरच्या फेरीत नुबेरशाहची गाठ भारताचा अांतरराष्ट्रीय मास्टर कृष्णा तेजाशी पडणार होती. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी डावाची सुरुवात करताना नुबेरशाहने अाक्रमक चाली रचल्या. त्यामुळे तेजाने अापला पराभव मान्य केला. मात्र सरस टायब्रेकच्या अाधारे नुबेरशाहला रौप्यपदकाचा मानकरी घोषित करण्यात अाले. गेल्या वर्षी याच गटात नुबेरशाहने सुवर्णपदक जिंकले होते.

वरिष्ठ गटातही पाडली छाप

नुबेरशाहने वरिष्ठ गटातही अापली छाप पाडली. नऊ फेऱ्यांच्या या लढतीत त्याने ४ विजय अाणि ४ सामन्यांत बरोबरी मिळवून सहा गुण मिळवले. एम. एच. साबू सिद्दीक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या नुबेरशाहने या गटात ग्रँडमास्टर प्रविण ठिपसे, ग्रँडमास्टर ललितबाबू आणि ग्रँडमास्टर सुंदरंजन किदम्बी यांसारख्या अनुभवी बुद्धिबळपटूंना बरोबरीत रोखले होते.


हेही वाचा -

शार्दूल ठाकूरला लाॅटरी, इंग्लंड दौऱ्यासाठी वनडे संघात निवड

मुंबईच्या प्रशिक्षकांची निवड लांबणीवर?


पुढील बातमी
इतर बातम्या