महेश माणगांवकरने जिंकली महाराष्ट्र अोपन स्क्वाॅश स्पर्धा

मुंबईच्या अव्वल मानांकित महेश माणगांवकरने अप्रतिम कामगिरी करत भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू अभिषेक प्रधान याला ११-८स १२-१०, १२-१० अशी पराभवाची धूळ चारत महाराष्ट्र राज्य पुरुषांच्या स्क्वाॅश स्पर्धेचे जेतेपद पटकावले. एसअारएफअाय अाणि एसअारएएमच्या मान्यतेने बाॅम्बे जिमखान्यावर रंगलेल्या या स्पर्धेत अभिषेकने अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना अनेक धक्कादायक विजयाची नोंद केली होती. त्यामुळे अंतिम फेरीत त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असताना महेशसमोर त्याचा निभाव लागला नाही.

पहिला गेम सहज खिशात

पहिल्या गेममध्ये अभिषेकला खेळात सातत्य राखण्यात अपयश अाल्याने महेशच्या बाबतीत सर्व गोष्टी सहज घडत गेल्या. महेशने पहिला गेम ११-८ असा सहज जिंकल्यानंतर त्याला दुसऱ्या गेममध्ये अभिषेकच्या अाव्हानाला सामोरे जावे लागले. १०-१० अशी स्थिती असताना महेशने दोन गुण मिळवत दुसरा गेमही अापल्या नावावर करून २-० अशी अाघाडी घेतली.

तिसऱ्या गेममध्येही कडवा संघर्ष

तिसऱ्या गेममध्येही दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. अभिषेकला महत्त्वाच्या वेळी गुण मिळविण्यात अपयश अाल्याने त्याला तिसऱ्या गेममध्ये हार पत्करावी लागली. विशेष म्हणजे, माणगांवकरने या स्पर्धेत एकही गेम न गमावता विजेतेपद पटकावले. महेश माणगावकरला १ लाख ३० हजार रुपयांचे तर अभिषेकला ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात अाले.

बाॅम्बे जिमखाना ही माझी सर्वात लकी जागा अाहे. या ठिकाणी मी माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली अाहे. बाॅम्बे जिमखान्यावर येऊन माझ्या कुटुंबियांनीही माझे सामने पाहिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी मोठी मजल मारू शकलो.

- महेश माणगांवकर, विजेता


हेही वाचा -

पृथ्वी शाॅची भारतीय कसोटी संघात निवड

कसोटीतही अोपनिंगला येण्यास रोहित शर्मा सज्ज


पुढील बातमी
इतर बातम्या