मोहन जोशी बनले ‘नटसम्राट’ आप्पा बेलवलकर

अभिनेते मोहन जोशी यांनी आपल्या चतुरस्र अभिनयाच्या बळावर विविध शिखरं सर करीत भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान पटकावलं आहे. मराठीमध्ये सामान्य व्यक्तीची भूमिका साकारता-साकारता थेट हिंदी चित्रपटातील खलनायक यशस्वीपणे साकारणारे जोशी आता रंगभूमीवर ‘नटसम्राट’ बनले आहेत. ४ नोव्हेंबरला नाट्य रसिकांच्या भेटीला येणाऱ्या या नाटकात त्यांनी साकारलेले आप्पा बेलवलकर पाहायला मिळतील.

पुन्हा रंगभूमीकडे

गतवर्षी चर्चा होती ती रंगभूमीवरून रुपेरी पडद्यावर गेलेल्या ‘नटसम्राट’ची. मोठ्या पडद्यावर यश मिळवल्यानंतर आता ‘नटसम्राट’ची पावलं पुन्हा रंगभूमीकडे वळली आहेत. अभिनेता-दिग्दर्शक ऋषिकेश जोशीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेलं ‘नटसम्राट’ हे नाटक आता रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या नाटकात मोहन जोशींनी आप्पा बेलवलकरांची मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्या जोडीला कावेरीच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी आहेत.

शिवधनुष्य उचललं 

वि. वा. शिरवाडकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या ‘नटसम्राट’मधील आप्पा बेलवलकर ही व्यक्तिरेखा यापूर्वी श्रीराम लागू, दत्ता भट, सतिश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी आदी मातब्बर नटांनी यशस्वीपणे साकारत रसिकांची दाद मिळवली आहे. आता हे शिवधनुष्य मोहन जोशींनी उचललं आहे. कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याची क्षमता असलेल्या जोशींच्या रूपात आप्पा बेलवलकर ही व्यक्तिरेखा कशी दिसते आणि त्यांच्या मुखातून ‘कुणी घर देता का घर...’ यांसारखे अजरामर संवाद कसे वाटतात हे पाहण्याची आणि ऐकण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर

एकदंत क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या नाटकाची प्रस्तुती झी मराठी करीत आहे. रंगभूमीच्या इतिहासातील सुवर्णपान ठरलेलं हे नाटक दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या संचात रसिकांसमोर सादर केलं जाणार आहे. या नाटकात सुशील इनामदार, भक्ती देसाई, श्वेता मेहेंदळे, अभिजीत झुंझारराव, मिलिंद अधिकारी, आशीर्वाद मराठे, सायली काजरोळकर आणि राम सईदपुरे या कलाकारांच्याही भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या हृषिकेशच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘होम स्वीट होम’ या पहिल्या चित्रपटात मोहन जोशींनी उत्तम अभिनय केला होता. त्यानंतर आता रंगभूमीवरही ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे.


हेही वाचा - 

कार्तिक वारीला अवतरणार ‘विठ्ठल’!

‘नाळ’ १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला


पुढील बातमी
इतर बातम्या