Advertisement

‘नाळ’ १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला


‘नाळ’ १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडीओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे ‘नाळ’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, १६ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


चित्रपटाचा ट्रेलर लाँच

सुधाकर यांनी ‘सैराट’, ‘विहीर’, ‘देऊळ’ या मराठी चित्रपटासोबतच ‘वीरे दि वेडिंग’ या हिंदी चित्रपटाचं छायाचित्रीकरण केलं असून, 'नाळ'मधून ते दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार. दीप्ती देवी तसंच झी स्टुडिओजचे सी.इ.ओ. शारिक पटेल, बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी, कन्टेन्ट हेड अश्विनीकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


आई आणि मुलाची गोष्ट

असं म्हणतात की, जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा आहे लहानग्या चैतन्यची. चैतू ८ वर्षाचा आहे. नदीच्या काठी वसलेल्या महाराष्ट्रातील एका दूरच्या खेड्यात तो राहतो. त्याचे वडील गावातील एक प्रतिष्ठित जमीनदार आहेत जे चैतूचे सगळे हट्ट पुरवतात.

प्रेमळ आणि मायाळू आई त्याचे खूप लाड करते. अशा सुंदर वातावरणात वाढणाऱ्या चैतन्यच्या भावविश्वाचा अनपेक्षित प्रवास नाळच्या कथासूत्रात उलगडताना दिसेल. ‘नाळ’सारखा चित्रपट खऱ्या अर्थाने चित्रभाषेत बोलू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध होईल यात शंका नाही.


'हे' गाण सोशल मीडियावर गाजलं

चित्रपटाची कथा आणि पटकथा यंकट्टी यांची असून, संवाद नागराज मंजुळेचे आहेत. चित्रपटात नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, सेवा चव्हाण, दीप्ती देवी, ओम भुतकर आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील ‘जाऊं दे न व’ हे ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध तसेच शब्दबद्ध केलेलं गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे. सारेगमप लिटिल चॅम्पमधील जयस कुमारने हे गाणं गायलं आहे. यक्कंटी यांनी दिग्दर्शनाबरोबरच छायाचित्रणातूनही चैतूचं भावविश्व चितारलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा