मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गाचा ३० टक्के भाग धोकादायक!

भारताच्या चार दिशांना जाेडणाऱ्या सुवर्ण चतुष्कोन मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गाचा ३० टक्के भाग धोकादायक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जागतिक बँक आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि इंटरनॅशनल रोड अॅसेसमेंट प्रोग्राम अशा संस्थांनी पहिल्यांदाच एकत्रितपणे केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी हा नक्कीच धोक्याचा इशारा आहे.

कशी केली चाचणी?

जागतिक बँकेच्या ग्लोबल रोड सेफ्टी, 'एनएचएआय' आणि इंटरनॅशनल रोड अॅसेसमेंट प्रोग्राम यांनी सुवर्ण चतुष्कोन राष्ट्रीय महामार्गाच्या मुंबई-दिल्ली आणि मुंबई-चेन्नई या दोन मार्गांचा अभ्यास केला. या अभ्यासात दोन्ही मार्गांच्या सुरक्षा मापदंडाची चाचणी करून त्याला मानांकन देण्यात आलं.

दिलं मानांकन

मानांकनानुसार ५,४३१ किमी लांबीच्या दोन्ही मार्गांच्या ३९ टक्के भागाला १-२ स्टार रेटिंग देण्यात आलं. २४५ किमीच्या ५५ टक्के भागाला ३-४ स्टार रेटिंग देण्यात आलं आणि केवळ ४० किमी अंतराच्या भागाला 'फाइव्ह स्टार' रेटिंग देण्यात आलं. १-२ स्टार रेटिंग म्हणजे सर्वात धोकादायक भाग. मानांकनानुसार मुंबई-दिल्ली महामार्गावरील ८२४ किमीच्या भागा १-२ स्टार रेटिंग मिळालं आहे. तर मुंबई-चेन्नई सुवर्ण चतुष्कोणचा निम्म्याहून अधिक भाग धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना वाहनाचा वेग प्रति तास ८० किमी ठेवण्याच्या सूचना अभ्यास अहवालात करण्यात आल्या आहेत.

वाहनचालकांसाठी धोका

अभ्यास अहवालातील निष्कर्षानुसार सुवर्ण चतुष्कोन राष्ट्रीय महार्गावरील ३० धोकादायक भाग कार, बस आणि ट्रकसाठी धोकादायक तर आहेच; परंतु मोटारसायकल, सायकल आणि पायी चालणाऱ्यांठी देखील हा महामार्ग जीवघेणा ठरत आहे. कारण या महामार्गावर सायकलवर जाणाऱ्यांसाठी किंवा पायी चालणाऱ्यांसाठी वेगळी कुठलीच सुविधा करण्यात आलेली नाही.

अपघातांचं प्रमाण सर्वाधिक

रस्ते अपघातातील मृत्यूंपैकी ३६ टक्के मृत्यू फक्त राष्ट्रीय महामार्गांवर होतात. २०१७ मध्ये ५२ हजार प्रवाशांचा राष्ट्रीय माहामार्गांवरील अपघातात मृत्यू झाला होता. तर राज्य महामार्गांवर ४० हजार प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. देशात असलेल्या एकूण रस्ते मार्गांपैकी केवळ २ टक्के रस्ते राष्ट्रीय महामार्गात येतात. तरीही राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचं प्रमाण जास्त आहे. त्यादृष्टीने हा अहवाल नक्कीच महत्त्वाचा ठरतो.


हेही वाचा-

कोकणात जाताय मग 'या' द्रूतगती मार्गाचा वापर करा : पोलिसांचं आवाहन

मेट्रोची धाव आता भाईंदरपर्यंत!


पुढील बातमी
इतर बातम्या