Advertisement

मेट्रोची धाव आता भाईंदरपर्यंत!

कुलाब्यापासून भिवंडीपर्यंत, तर अंधेरीपासून दहिसरपर्यंत मेट्रोचं जाळं विणण्यात आलं आहे. असं असताना दहिसरच्या पुढंही मेट्रो नेण्यात यावी, अशी मागणी मिरारोड-भाईंदरमधील रहिवासी करत होते. ही मागणी मान्य करत 'एमएमआरडीए'ने दहिसर ते भाईंदर हा मेट्रो-९ मार्ग करण्याचा निर्णय घेतला.

मेट्रोची धाव आता भाईंदरपर्यंत!
SHARES

मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने मुंबईत मेट्रो प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यानुसार कुलाब्यापासून भिवंडीपर्यंत, तर अंधेरीपासून दहिसरपर्यंत मेट्रोचं जाळं विणण्यात आलं आहे. असं असताना दहिसरच्या पुढंही मेट्रो नेण्यात यावी, अशी मागणी मिरारोड-भाईंदरमधील रहिवासी करत होते. ही मागणी मान्य करत 'एमएमआरडीए'ने दहिसर ते भाईंदर हा मेट्रो-९ मार्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मार्गाच्या बांधकामाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.


मेट्रो-७ चाही विस्तार

त्याचवेळी मेट्रो-७ चा विस्तार अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मेट्रो-७ अ मार्गालाही यावेळी मंजुरी दिली आहे. या दोन्ही मेट्रो मार्गाच्या विस्तारामुळे मुंबईकरांना त्यातही मिरारोड-भाईंदरवासीयांना आणि विमानतळाकडे जाणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दोन्ही प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाल्याने लवकरच या प्रकल्पांच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात येतील. त्यानंतर बांधकामाचं कंत्राट अंतिम करत बांधकामास सुरूवात करण्यात येईल आणि २०२२ पर्यंत हे दोन्ही मेट्रो मार्ग पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती 'एमएमआरडीए'चे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


दहिसर टोलनाक्याहून पुढे

अंधेरी ते दहिसर मेट्रो-७ आणि डी. एन. नगर ते दहिसर मेट्रो-२ प्रकल्प 'एमएमआरडीए'कडून हाती घेण्यात आले आहेत. हे दोन्ही मेट्रो मार्ग दहिसरपर्यंत धावणार आहेत, अशावेळी दहिसरच्या पुढं मेट्रो नेण्यासाठी दहिसर ते भाईंदर असा विस्तार करण्यासाठी मेट्रो-९ मार्ग आणण्यात आला. दहिसर टोलनाक्यावरून हा मार्ग पुढं भाईंदरच्या दिशेने नेण्यात येणार आहे.




त्यानुसार या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला. तर दुसरीकडे अंधेरी ते दहिसर मेट्रो-७ चा विस्तार विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची सोय लक्षात घेत अंधेरी ते विमानतळ असा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ असा मेट्रो-७ अ मार्गाचा आराखडा तयार केला. या दोन्ही मार्गांना मंगळवारी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.


किती किमीचा मार्ग?

अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मेट्रो-७ अ ३.१७ किमीचा मार्ग असणार असून यात केवळ एकच मेट्रो स्थानक असणार आहे. तर मेट्रो-९ दहिसर ते मिरा-भाईंदर मार्ग १०.४१ किमीचा असणार असून यात १० मेट्रो स्थानक असणार आहेत. हे दहाही मेट्रो स्थानक उन्नत असणार आहेत, तर मेट्रो-७ अ मधील मेट्रो स्थानक भुयारी असणार आहे.

दरम्यान या दोन्ही मेट्रो मार्गासाठी, मेट्रो-९ आणि मेट्रो-७ अ साठी एकूण ६६०० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे असंही कवठकर यांनी सांगितलं आहे. या दोन्ही मार्गांच्या कामाला आता लवकरच सुरूवात होणार आहे. तर हा मार्ग २०२२ पर्यंत पूर्ण झाल्यास त्याचा मोठा फायदा चाकरमान्यांना होणार असल्याचा दावाही 'एमएमआरडीए'नं केला आहे.



हेही वाचा-

मेट्रो ३ चा ५ किमीचा भुयारी मार्ग पूर्ण

खूशखबर... मेट्रो २ ब सह ठाणे मेट्रोच्या कामाला सुरूवात


 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा