SHARE

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ च्या कामाला मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) ने वेग दिला असून पावसाळ्यातही मेट्रो-३ चं काम जोरात सुरू आहे. त्यातही मुंबईच्या पोटात सोडण्यात आलेल्या टीबीएम मशिनच्या माध्यमातून भुयारी मार्ग खोदण्याचं काम अगदी वेगात सुरू आहे.

वर्षभराच्या आतच दहा महिन्यांत ३२.५ किमीच्या मेट्रो मार्गापैकी ५१०० मीटर अर्थात ५ किमीच्या भुयारी मार्गाचं काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली आहे.


१५ टीबीएम मशीन दाखल

मेट्रो-३ हा संपूर्ण भुयारी मार्ग असून मुंबईसारख्या शहरात भुयारी मार्गाचं काम करणं अत्यंत अवघड होतं. भूमिगत वाहिन्या आणि जुन्या इमारतींना धक्का न पोहचवत भुयारी मार्ग मार्गी लावण्याचं मोठं आव्हान एमएमआरसीसमोर होतं. हे आव्हान पेलत एमएमआरसीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत टीबीएम मशिनद्वारे भुयारी मार्ग खोदण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार परदेशातून अत्याधुनिक अशा १७ टीबीएम मशीन एमएमआरसीनं मागवल्या आहेत. त्यापैकी १५ टीबीएम मशीन मुंबईत दाखल्या झाल्या आहेत.


८ मशीनकडून काम सुरू

१५ पैकी ८ मशीन मुंबईच्या पोटात शिरल्या असून भुयारी मार्ग खोदण्याचं काम या मशिनकडून सुरू आहे. तब्बल दोन वर्षांनंतर या मशीन ३२.५ किमीचा भुयारी मार्ग खोदून मुंबईच्या पोटातून बाहेर पडणार आहेत. तर सर्वच्या सर्व १७ टीबीएम मशिन आॅक्टोबर २०१८ मध्ये कार्यरत होतील, असंही भिडे यांनी स्पष्ट केलं आहे.


सर्व मशीन लवकरच कार्यरत 

ज्या ८ टीबीएम मशिनच्या माध्यमातून भुयारी मार्ग खोदण्याचं काम सुरू आहे. दहा महिन्यांपूर्वी पहिलं टीबीएम मशिन मुंबईच्या भुगर्भात सोडण्यात आलं होतं. त्यानंतर एक-एक करत ८ टीबीएम मशिन भुगर्भात सोडण्यात अाल्या. १७ पैकी केवळ ८ टीबीएम मशिननं १० महिन्यांत ५ किमीचा भुयारी मार्ग खोदला असून सर्वच्या सर्व टीबीएम मशीन कार्यरत झाल्यास भुयारी मार्ग खोदण्याचं काम आणखी वेगानं होईल, असा विश्वासही भिडे यांनी व्यक्त केला आहे.हेही वाचा -

प्राॅपर्टी वेबसाइट्सदेखील महारेराच्या कक्षेत आणा!

मेट्रो-७ : कांदिवलीत दोन गर्डरचं यशस्वी लाॅन्चिंग 

संबंधित विषय
ताज्या बातम्या