खूशखबर... मेट्रो २ ब सह ठाणे मेट्रोच्या कामाला सुरूवात

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)नं ठाणेकरांसाठी मेट्रो-४ प्रकल्प हाती घेतला असला, तरी या प्रकल्पाचं काम मार्गी लागत नसल्यानं ठाणेकरांचं मेट्रो प्रवासाचं स्वप्न लांबत चाललं होतं. मात्र ठाणेकरांची ही नाराजी लवकरच दूर होणार आहे.

SHARE

मुंबईकरांचं मेट्रो प्रवासाचं स्वप्न टप्प्याटप्प्याने साकार होत असताना ठाणेकरांनाही मेट्रोची प्रतिक्षा लागून राहिली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)नं ठाणेकरांसाठी मेट्रो-४ प्रकल्प हाती घेतला असला, तरी या प्रकल्पाचं काम मार्गी लागत नसल्यानं ठाणेकरांचं मेट्रो प्रवासाचं स्वप्न लांबत चाललं होतं. मात्र ठाणेकरांची ही नाराजी लवकरच दूर होणार आहे. कारण एमएमआरडीएनं मुंबईतील मेट्रो-२ ब सह मेट्रो-४ च्या अर्थात ठाणे मेट्रोच्या कामाला सुरूवात केली आहे.


कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएमआरडीएनं मुंबईपाठोपाठ मुंबई महानगर प्रदेशातही मेट्रोचं जाळं विणण्याचा निर्णय घेतला. त्याचाच भाग म्हणून ठाणे-४ अर्थात वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार ४ महिन्यांपूर्वी हा मेट्रो मार्ग मार्गी लावण्यासाठी ५ पॅकेजसाठी ५ स्वतंत्र कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. आता यापुढं जात एमएमआरडीएनं मेट्रो-४ च्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे.


पायाभूत कामे

तर, मेट्रो-२ ब अर्थात डि. एन. नगर ते मंडाले मेट्रो मार्गाच्याही कामाला एमएमआरडीएनं सुरूवात केली आहे. त्यानुसार आता या दोन्ही मेट्रो मार्गाच्या कामासाठी बॅरिगेटींग लावण्याचं काम हाती घेण्यात आल्याचं एमएमआरडीएनं सांगितलं आहे. बॅरिगेटींग लावत टेस्ट पायलिंग, सर्वेक्षण, भौगोलिक-तांत्रिक चाचण्या, सेवा वाहिन्यांचा शोध घेणं अशी कामे पावसाळ्याच्या ४ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचंही एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


सहकार्याचं आवाहन

मेट्रो-२ च्या कामासाठी डि. एन. नगर ते मंडालेदरम्यानच्या आणि मेट्रो-४ च्या कामासाठी वडाळा ते कासारवडवलीदरम्यानच्या रस्त्यावर बॅरिगेटींग लावून रस्ते बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळं मुंबईकरांना आणि ठाणेकरांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. असं असताना एमएमआरडीएनं मात्र मुंबईकरांना आणि ठाणेकरांना सहकार्याचं आवाहन करत बॅरिगेटींग असलेल्या ठिकाणी कुणीही, त्यातही विशेषत्वानं लहान मुलांना अशा ठिकाणी एकटं सोडू नये, असं आवाहन केलं आहे.हेही वाचा-

मुंबईकरांनो, घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचा सायकलनं!

'मुंबई तुंबणार नाही', एमएमआरडीए, मेट्रोची ग्वाहीसंबंधित विषय
ताज्या बातम्या