Advertisement

'मुंबई तुंबणार नाही', एमएमआरडीए, मेट्रोची ग्वाही

पावसाळ्यात पाणी तुंबल्यास विविध प्राधिकरणांशी समन्वय साधून उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या धर्तीवर आपात्कालीन नियंत्रण कक्ष सुरु करण्याची हमी एमएमआरडीएने दिली आहे.

'मुंबई तुंबणार नाही', एमएमआरडीए, मेट्रोची ग्वाही
SHARES

मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे मुंबईत पाणी तुंबण्याची भीती व्यक्त करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महापौरांनीही यासाठी सरकार जबाबदार असेल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर सरकारी यंत्रणा जागी झाली असून पावसाळ्यात पाणी तुंबल्यास विविध प्राधिकरणांशी समन्वय साधून उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या धर्तीवर आपात्कालीन नियंत्रण कक्ष सुरु करण्याची हमी एमएमआरडीएने दिली आहे. एवढेच नव्हे, तर मेट्रोची कामे सुरु असलेल्या ठिकाणी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या माध्यमातून तब्बल २४१ ठिकाणी पाण्याचा निचरा करणारे पंप बसवण्यात येणार आहेत.


पालिका मुख्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक

मुंबईत ‘मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ मर्यादित’ व ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए) यांच्या माध्यमातून विविध कामे सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर येत्या पावसाळ्यात पाण्याचा अधिक प्रभावीपणे निचरा होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या यंत्रणांमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय बैठक बुधवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयात झाली. या बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्यासह दोन्ही प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होते.



दोन्ही संस्थांचं कामावर बारीक लक्ष

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील, तसेच दहिसर ते अंधेरी दरम्यानच्या लिंक रोडवरील मेट्रो खांबांच्या भोवताली पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना एमएमआरडीए व दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ यांना बुधवारच्या बैठकीदरम्यान देण्यात आल्या. या वर्षीच्या पावसाळ्यापासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांप्रमाणेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे संबंधित अधिकारी देखील प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आवश्यक ती कार्यवाही करणार आहेत. तसेच, गरजेनुसार वरिष्ठ स्तरावरील अधिकारी देखील नियमित संपर्कात राहतील. एमएमआरडीए व मेट्रो यांच्या स्तरावर समन्वय साधला जावा, यासाठी या दोन्ही संस्था समन्वय अधिकाऱ्यांची (नोडल ऑफिसर) नेमणूक करेल, असे या बैठकीत ठरवण्यात आले आहे.


२३६ पंप करणार साचणाऱ्या पाण्याचा उपसा

गेल्या वर्षी ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास तुलनेने अधिक कालावधी लागला, त्या-त्या ठिकाणी पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे व्हावा; यासाठी अधिक काळजी घेण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाद्वारे ज्या ठिकाणी कामे चालू आहेत व ज्या ठिकाणी पाणी साचू शकते, अशा ठिकाणी मेट्रो रेल्वेद्वारे २४१ पंप बसविण्याची हमी मेट्रो रेल्वेद्वारे देण्यात आली. याव्यतिरिक्त पावसाच्या पाण्याचा अधिक प्रभावीपणे निचरा होण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून यावर्षी २९५ पंप बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या वर्षीच्या पावसाळ्यात मुंबई महानगरपालिका व मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ यांच्याद्वारे एकूण ५३६ पंप बसवण्यात येणार आहेत.



मेट्रो-एमएमआरडीएचा विशेष नियंत्रण कक्ष

पावसाळ्यात समन्वयाच्या दृष्टीने अडचणींचे निराकरण अधिक प्रभावीपणे करता यावे, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ यांच्या स्तरावर देखील आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे २४ तास (२४ x ७) कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली. मुंबई सेंट्रल, कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक येथील पर्जन्यजल वाहिन्या मेट्रो स्टेशनच्या कामासाठी वळवण्यात येणार आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात असून ते ३१ मे पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी या बैठकीत दिली.



हेही वाचा

व्हाॅटस-अॅपद्वारे करा मुंबईतील खड्ड्यांची तक्रार


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा