प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना एसटी देणार संधी

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • परिवहन

वेतनवाढीच्या मुद्यावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी) च्या कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जून रोजी कामबंद आंदोलन पुकारलं होतं. अचानक करण्यात आलेल्या या संपात मुंबईसह राज्यभरातील कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये केवळ एक दोन महिन्यापुर्वीच कामावर रुजू झालेले १०१० कर्मचारी होते. त्या सर्व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलत एसटी प्रशासनानं त्यांना सेवामुक्त केलं आहे. त्यांंच्या जागेवर आता नवीन उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

५०३ उमेदवारांना संधी

एसटी महामंडळानं २०१७ साली कोकणातील ६ जिल्ह्यासाठी ७९२९ चालक, वाहक, सहाय्यक, लिपिक आणि पर्यवेक्षक अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. यावेळी  जवळपास १४ हजार पदाकरिता प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी ९ हजार उमेदवारांना विविध पदांवर एसटी महामंडळाने नियुक्त केले. तर अनेक उमेदवार हे प्रतीक्षा यादीमध्ये होते. त्यापैकी ५०३ उमेदवारांना आता तातडीने नियुक्त केले जाणार आहे.

२५ जूनपासून प्रशिक्षण 

या सर्व ५०३ उमेदवारांना चालक आणि वाहक पदाच्या प्रशिक्षणासाठी २५ जूनपासून महामंडळातर्फे बोलावण्यात येणार आहे. तसेच जे उमेदवार परीक्षा पास होऊनही कागदपत्रातील त्रुटींमुळे भरती प्रक्रियेतून बाद झाले अशा उमेदवारांना सुद्धा आपल्या कागदपत्रांची दुरुस्ती करून पुन्हा बोलावण्यात आले आहे. तर अनुत्तीर्ण उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे.

१५०० कर्मचारी होतील रुजू

तातडीने रुजू करण्यात आलेले ५०३ उमेदवार आणि पुन्हा परीक्षा घेऊन तसेच त्रुटी दुरुस्त करून आलेले कर्मचारी असे जवळपास १५०० चालक आणि वाहक कर्मचारी एसटीला मिळणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा -

अंधेरीतल्या गर्दीमुळे ३ लोकलचं वेळापत्रक बदलणार

लालफितीत अडकला ज्यूट पिशव्यांचा निधी


पुढील बातमी
इतर बातम्या