एसटी महामंडळ १०९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनप्रकरणी एसटी महामंडळ १०९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. त्यांनी केलेले गुन्हे गंभीर आहेत. त्याबाबत लवकरच महामंडळाकडून निर्णय घेण्यात येणार असल्याचं परब यांनी सांगितलं.

विलीनीकरणाची मागणी आणि कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानाबाहेर चप्पल, दगडफेक करून आंदोलन केल़े . याप्रकरणी न्यायालयानं १०९ कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, एसटी महामंडळानं निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कारवाया मागे घेतानाच कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी २२ एप्रिल ही मुदत दिली आहे. त्यामुळे कर्मचारी कामावर परतण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात आले.

मात्र, १०९ आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार की नाही, असा सवालही उपस्थित होत होता. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांनी, या कर्मचाऱ्यांनी केलेला गुन्हा गंभीर असल्याचं सांगितलं. त्यांच्यावर सध्या कायदेशीर कारवाई केली जात आहे. यासंदर्भात लवकरच महामंडळातील अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगितलं.

आतापर्यंत ७ हजार ३९७ चालक आणि ७७७१ वाहक कामावर रूजू आहेत. शनिवारी एक हजार १३ कर्मचारी रूजू झाल़े त्यात ७०० पेक्षा जास्त चालक, वाहक आहेत. सर्वाधिक कर्मचारी हे ठाणे विभागातील असून, त्यांची संख्या १०० आहे.


हेही वाचा

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांवर मोठी कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागील सूत्रधार कोण? गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

पुढील बातमी
इतर बातम्या