महिलांच्या डब्यात अवतरलं मत्स्यालय

मध्य रेल्वेच्या महिला लोकल डब्यामध्ये शिरल्यानंतर प्रवाशांना निसर्गचित्रांचा सुखद धक्का बसत आहे. त्यानंतर लवकरच महिलांच्या डब्यात रंगीबेरंगी मासेही तरंगताना दिसणार आहे. लोकलमधील गर्दी, गोंधळाचा प्रवास नित्यनियमाचा झालेला असताना महिलांच्या डब्यात मत्स्यालय रेखाटण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

रेल्वेचा प्रयोग

महिलांचा प्रवास सुखद व आनंददायी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी महिलांचे दोन डबे फुलपाखरं, रंगबेरंगी फुलांनी रंगवण्यात आले होते. प्रायोगिक तत्वावर रंगवण्यात आलेले हे डबे सध्या महिला प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. त्यानंतर या महिलांच्या डब्यात पाण्यात पोहणारे मासे अवतरणार आहेत. अर्थात चित्रस्वरूपात.

डोळ्यांना सुखावणारी रंगसंगती

माटुंगा कार्यशाळेत आणखी दोन नव्या डब्यांना रंगरूप देण्यात आलं असून, लवकरच ते सेवेत दाखल होणार आहेत. रेल्वे डब्यातील अंतर्गत भागात रंग देण्याची पद्धत ठरलेली असताना मध्य रेल्वेनं ही परंपरा मोडीत काढत आणखी दोन डब्यांना नवा साज चढवण्याचा निर्णय घेतला आहे. महिला प्रवाशांना दिवसभरातील ताण विसरण्यासाठी डोळ्यांना सुखावणारी रंगसंगती यात वापरण्यात आली आहे.

कुणाचं योगदान

एका बाजूला निळ्या रंगछटातील समुद्राचं पाणी, तर दुसऱ्या बाजूला समुद्रात तरंगणारे रंगीबेरंगी मासे, कासव तसंच समुद्राच्या तळाला असणारं शेवाळ असा हा नजारा डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरणार आहे. अमोल धाबडे, चंदू अगुरू या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी या कामी पुढाकार घेतला असून त्यांच्या कल्पकतेतून रंगात सजलेले डबे मध्य रेल्वेवरील कुतूहलाचा विषय ठरणार आहेत. या प्रयोगानंतर भविष्यातही त्याच पद्धतीने रंगछटांनी सजलेले डबे सेवेत दाखल करण्यात येणार आहेत.


हेही वाचा-

मुंबई लोकलचं 'शाॅकिंग' सत्य!

मेट्रोची धाव आता भाईंदरपर्यंत!


पुढील बातमी
इतर बातम्या