बेस्ट कामगारांचा संप २० ऑगस्टपर्यंत स्थगित, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संप

बेस्ट प्रशासन कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्यानं मंगळवारी मध्यरात्रीपासून होणारा बेस्ट कामगारांचा संप २० ऑगस्टपर्यंत तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या सुधारित वेतनश्रेणीबाबत सुरू असलेल्या वाटाघाटीची दुसरी बैठक मंगळवारी यशस्वी ठरली. त्यामुळं २० ऑगस्टपर्यंत बेस्ट उपक्रमासोबत होणाऱ्या बैठकीत यावर तोडगा काढला जाणार आहे. मात्र, कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास २० ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संप पुकारण्याचा इशारा संयुक्त कामगार कृती समितीकडून देण्यात आला आहे.

प्रशासन वाटाघाटीसाठी तयार

बेस्टच्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी जानेवारीमध्ये संप पुकारला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या मध्यस्थीच्या माध्यमातून बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये वाटाघाटी सुरू झाली. बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये जून महिन्यात सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर एक महिना उलटला तरी प्रशासन चर्चेला बोलवलं नसल्यानं संयुक्त कामगार कृती समिती ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली होती. परंतु, प्रशासन वाटाघाटी करण्यास तयार असल्यानं संप करू नये, असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आलं.

सकारात्मक चर्चा

हा संप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कामगार संघटनांना मंगळवारी दुपारी चर्चेसाठी बेस्ट भवनात बोलवलं होतं. या बैठकीत कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यामुळं नियोजित संप पुढे ढकलण्यात येत असल्याचं शशांक राव यांनी परळ येथील शिरोडकर शाळेत आयोजित कामगार मेळाव्यात जाहीर केलं. त्यामुळं संपाचं संकट तूर्तास टळलं आहे. मात्र, ९ ते १९ ऑगस्टदरम्यान, बेस्ट प्रशासनानं कामगार संघटनांना चर्चेसाठी बोलावलं आहे. यासाठी ५ तारखा दिल्या आहेत. या कालावधीत निर्णय न झाल्यास २० ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा राव यांनी दिला आहे.


हेही वाचा -

सुषमा स्वराज यांचं निधन, सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली

मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्याची हत्या


पुढील बातमी
इतर बातम्या