SHARE

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. सुषमा स्वराज यांची दुपारी ३ वाजता अंत्ययात्रा निघणार असून लोधी रोडवरील स्मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच राजकीय पक्षांमधून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 'माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळं देशाच्या राजकारणातील झंझावाती व्यक्तिमत्व हरपलं आहे’, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देशाचं नुकसान

'सुषमा स्वराज यांचं जाणं हे मनाला चटका लावून जाणारं आहे. त्यांच्या जाण्यानं देशाचं नुकसान झालं आहे. तरुण वयात राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुषमा स्वराज यांनी हरियाणाच्या मंत्रिपदासह दिल्लीचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं होतं. एक श्रेष्ठ विधिज्ञ, साहित्यप्रेमी, प्रभावी वक्त्या, अभिजात रसिक असं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही विशेष पैलू होते. त्यांच्या निधनानं आपण ज्येष्ठ नेत्या आणि मार्गदर्शक गमावल्या आहेतच, पण त्यासोबत माझीही वैयक्तिक हानी झाली आहे', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेश दिला आहे.

तेजस्वी युगाचा अंत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सुषमा यांच्या निधनानं भारतातील राजकारणातून एका तेजस्वी युगाचा अंत झाला आहे. सुषमाजींच्या जाण्यानं केवळ देश आणि भारतीय जनता पक्षाचीच नव्हे, तर ठाकरे परिवाराचीही अपरिमित हानी झाली आहे. त्यांनी शिवसेना आणि प्रेमाचा दुवा म्हणून काम केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सुषमा स्वराज यांच्या नात्यात एक आत्मीयता होती. बाळासाहेबांच्या जाण्यानंतरही हे नातं कायम राहिलं. त्यांच्या वागण्या बोलण्यात तेज होतं. मी संपुर्ण शिवसेना आणि ठाकरे परिवारातर्फे त्यांना श्रद्धासुमनं अर्पण करतो', असं म्हटलं आहे.

संपूर्ण देश शोकाकुल

'अतिशय निष्ठेनं आणि कर्तव्यदक्षतेनं त्यांनी देशाची सेवा केली. आज संपूर्ण देश त्यांच्या जाण्यानं शोकाकुल झाला आहे. या आमच्या देशभक्त आईस शतशः प्रणाम! सुषमा जी या आमच्यासाठी मातृतुल्य रणरागिणी होत्या. 'नारी शक्ती'चं त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या. आत्मविश्वास आणि पोलादीपणानं त्यांनी हर एक कार्यक्षेत्र गाजवले. आपल्या वक्तृत्व आणि संभाषण कौशल्यानं प्रत्येकाचं मन जिंकून घेतलं', असं सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

निधन धक्कादायक

'सुषमा स्वराज यांचं निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शोकसंदेश दिला आहे.हेही वाचा -

सुषमा स्वराज यांचं निधनसंबंधित विषय
ताज्या बातम्या