महाव्यवस्थापक, पालिका आयुक्तांना हटवा, बेस्ट कर्मचाऱ्यांची मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • परिवहन

बेस्टच्या आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आजच्या दुर्दशेला बेस्ट प्रशासन आणि पालिका कारणीभूत असल्याचा आरोप करत बेस्टचं पालिकेत विलीनीकरण करावं, बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढावं या मागणीसाठी शुक्रवारी कर्मचारी रस्त्यावर उतरले. अाझाद मैदान येथे केलेल्या अांदोलनात कर्मचाऱ्यांनी पालिका आणि बेस्ट प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

 आपल्या मागण्यांचं निवेदन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देत बेस्टला वाचवण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी उचलून धरली. यावेळी संतप्त आंदोलकांनी थेट महाव्यवस्थापक आणि पालिका आयुक्तांनाच हटवण्याचीही मागणी केली आहे.

बेस्टला सावत्रपणाची वागणूक

मुंबईची दुसरी लाईफलाईन असणारी बेस्ट सध्या तोट्याच्या खाईत अडकली आहे. याचा फटका बेस्ट कर्मचाऱ्यांना बसत अाहे.  अपुऱ्या संख्येमुळं कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. तर त्यांना पगारही वेळेत मिळत नाही. बेस्टच्या अनेक कुचकामी धोरणांचाही फटका कर्मचाऱ्यांसह बेस्टला बसत आहे. असं असताना बेस्ट प्रशासन आणि मुंबई महानगर पालिका बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी काहीही करताना दिसत नाही. उलटपक्षी पालिकेकडून बेस्टला सावत्रपणाची वागणूक मिळत आहे.

पालिकेत विलीनीकरण करा

बेस्टचं पालिकेत विलीनीकरण करण्यासह कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी कर्मचारी सातत्यानं पाठपुरावा करत असून त्यांनी  अांदोलनही केलं आहे. पण तरीही या मागण्याकडे बेस्ट महाव्यवस्थापक असो वा पालिका आयुक्त काहीही लक्ष देत नसल्याचं म्हणत बेस्ट कामगार सेना, मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार क्रांती या शिवसेनाप्रणित कामगार संघटनानी शुक्रवारच्या आंदोलनाची हाक दिली होती.

प्रवाशी घटले

तीन-चार वर्षांपूर्वी बेस्टची प्रवासी संख्या ४५ लाख इतकी होती. पण आता हीच प्रवाशी संख्या २५ ते २८ लाखांवर आली आहे. शेअर टॅक्सी, खासगी प्रवासी वाहतुक आणि मोनो-मेट्रोचा फटका बसल्यानं ही प्रवाशी संख्या कमी झाल्याची माहिती बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष सुनील श्राॅफ यांनी दिली आहे. तर प्रवासी संख्या कमी होत असताना, त्यामुळं मोठं आर्थिक नुकसान होत असतानाही बेस्टकडून मात्र प्रवाशी संख्या वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही.

भरती नाही

२०१३ ते २०१८ पर्यंत बेस्ट वीज विभागातील ग्राहकांची संख्या वाढलेली असताना कर्मचाऱ्यांची कुठलीही भरती या काळात झालेली नाही. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. तर बेस्ट आणि वीज विभागातील कर्मचाऱ्यांना पगारही वेळत मिळत नसल्याचंही श्राॅफ यांनी स्पष्ट केलं आहे.

...तर तीव्र अंदोलन

महाव्यवस्थापक आणि पालिका आयुक्तांच्या निषेधार्थ हे एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं असलं तरी सध्या कर्मचाऱ्यांध्ये महाव्यवस्थापक अाणि पालिका आयुक्त यांच्याबाबत मोठा रोष आहे. त्यामुळे आमच्या मागण्या येत्या काही दिवसांत मान्य झाल्या नाही तर हा रोष आणखी तीव्र स्वरूपात बाहेर पडेल, असा इशारा बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस विठ्ठल गायकवाड यांनी यावेळी दिला आहे.  

तर महापौरांना आम्ही निवेदन दिलं असून या निवेदनावर पालिका आणि बेस्ट प्रशासनानं लवकरात लवकर काही निर्णय घेतला नाही तर कर्मचारी यापुढं थेट मंत्रालयावर धडकतील असा इशाराही श्राॅफ यांनी दिला आहे.


हेही वाचा - 

ठाणे स्थानकावरील भार लवकरच 'हलका', विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा

तामिळनाडू, गुजरातसाठी १६ जुलैपासून हमसफर एक्सप्रेस


पुढील बातमी
इतर बातम्या