मुंबईच्या रस्त्यांवर धावली ‘तेजस्विनी’

बेस्टनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लेडीज स्पेशल लोकल प्रमाणं आता महिलांना बेस्टच्या लेडीज स्पेशल बस म्हणजेच 'तेजस्विनी' बसमधून प्रवास करता येणार आहे. गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांचा प्रवास सुकर व सुरक्षित करण्याकरिता राज्य सरकारच्या ‘तेजस्विनी’ उपक्रमांतर्गत बेस्टने महिलांसाठी तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

६ बस सेवेत

गुरुवारपासून पहिली बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एन.सी.पी.ए दरम्यान चालवण्यात आली. या मिडी बसगाड्या असून अशा ६ बस सेवेत आल्या असल्याची माहिती बेस्ट उपक्रमानं दिली. बेस्ट बसनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळं बेस्ट उपक्रमाकडून महिला विशेष बसगाड्याही चालवण्यात येत आहेत. तर सध्याच्या बसगाड्यामध्ये महिलांसाठी आसनंही राखीव ठेवण्यात आली आहेत.

टप्प्याटप्यात सेवेत

तेजस्विनी बस योजनेअंतर्गत बिगर वातानुकूलित मिडी बस उपलब्ध करण्याचा निर्णय बेस्टनं घेतला होता. त्यानुसार, ३७ बस टप्प्याटप्यात सेवेत येणार आहेत. २८ नोव्हेंबरपासून ‘विशेष १’ या बसमार्गावर दर ७ मिनिटांच्या अंतराने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एन.सी.पी ए दरम्यान सकाळी ८.०५ ते सकाळी ११.३० आणि दुपारी ४.३० ते रात्री ८ या वेळेत चालवण्यात येतील.

विशेष बस सेवा

सध्या २९ मार्गावर आधीपासूनच बेस्टच्या महिला विशेष बस सेवा सुरू आहे. यामध्ये मंत्रालय ते सीएसएमटी, एन.सी.पी.ए ते सीएसएमटी, वरळी गाव ते वीर कोतवाल उद्यान, कन्नमवार नगर ते आगरकर चौक, कुर्ला स्टेशन (पश्चिम) ते वांद्रे बस स्थानक (पश्चिम), बोरीवली स्टेशन ते रावळपाडा यासह अनेक मार्गावर सध्या महिला विशेष बस धावत आहेत.


हेही वाचा -

'हा' रेल्वे प्रकल्प महागला, प्रवासी नाराज

रायगडाच्या विकासासाठी २० कोटी मंजूर, मुख्यमंत्र्यांची घोषणा


पुढील बातमी
इतर बातम्या