महापालिकेने वर्षभरात मुंबईत लावली ‘इतकी’ झाडं, आकडेवारी आली समोर

एका बाजूला आरेतील झाडांच्या कत्तलीची चर्चा सुरू असताना मुंबई महापालिकेने गेल्या वर्षभरात मुंबईतील मोकळ्या जागा आणि रस्त्यांच्या कडेला एकूण ९,७२१ झाडं लावल्याचं समोर आलं आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ दरम्यानची ही आकडेवारी असून या कालावधीत महापालिकेनं दररोज २७ झाडं लावली आहेत.

‘इतकी’ झाडं लावली

महापालिकेच्या पर्यावरण अहवालात ही आकडेवारी नमूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या पुढील आठवड्यातील सर्वसाधारण सभेत हा अहवाल ठेवण्यात येणार आहे. या अहवालानुसार महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे ९,७२१ झाडांपैकी २,३२२ झाडं मुंबई शहरात, ४,६६९ झाडं पश्चिम उपनगरात आणि २,७३० झाडं पूर्व उपनगरात लावण्यात आली आहेत. शिवाय इतर झाडांची चांगली वाढ होण्यासाठी ९,८२२ झाडांच्या मुळानजीकचं काँक्रिट आणि डेब्रिज हटवण्यात आल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

मृत झाडांची छाटणी

शहरात नवीन झाडं लावण्याव्यतीरिक्त उद्यान विभागाने झाडांवर किटकनाशकाची फवारणी देखील केली आहे. ९६,३३० झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या आहेत. तसंच ८४४ मृत अवस्थेतील झाडांची छाटणी करण्यात आली आहे. 

२० हजार झाडं लावणार

मुंबईत सद्यस्थितीत २९० उद्यान, ४६२ करमणूक मैदान आणि ३५७ खेळांची मैदानं आहेत. मुंबईतील हिरवळ वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेने २०१९-२० मध्ये एकूण २० हजार झाडं म्हणजेच रोज ५५ झाडं लावण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे.   

 


हेही वाचा-

आरेतील मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेडला मुंबईकरांचा विरोध

शर्मिला ठाकरेंनीही केला आरे कारशेडचा विरोध


पुढील बातमी
इतर बातम्या