मुंबईतील ६ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेत वाढ

मध्य रेल्वे मार्गावरून दररोज अंदाजे ४३ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांचा सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. अशातच, आता प्रवाशांच्या सुरक्षेत कोणतीही कमतरता भासू नये यासाठी, मध्य रेल्वे मार्गावरील ३ टर्मिनससह ६ स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय रेल्वे सुरक्षा बलानं घेतला आहे. त्यामुळं स्थानकात प्रवाशांच्या वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणं सोपं होणार आहे. 

सुरक्षा व्यवस्थेत वाढ

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस यांसह ६ स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला असून, मध्य रेल्वेच्या मुख्यालयालाही पाठवण्यात आला आहे. तसंच, वर्षभरात हे बदल करण्यात येणार आहेत.

४३ लाख प्रवासी

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर एकुण ७८ स्थानकं असून अंदाजे ४३ लाख प्रवासी दररोज प्रवास करत असतात. तसंच, दररोज मध्य रेल्वेवर १७७२ लोकल फेऱ्या चालविल्या जातात. मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांत पादचारी पूल आणि सरकते जिने यांचं बांधकाम चालू असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. 

प्रवाशांची वाढती संख्या

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. तसंच, ‘इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम’ योजनेअंतर्गत सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. मात्र, प्रवाशांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय रेल्वे सुरक्षा बलानं घेतला आहे.


हेही वाचा -

करून दाखवलं! शिवसेनेच्या नव्या लोगोतून 'भगवा' गायब

मुंबईचं तापमान पुन्हा जाणार ४० अंशांवर


पुढील बातमी
इतर बातम्या